संतोष भडवळकर व सहकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी
गुहागर प्रतिनिधी:
यावर्षी संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर
शासन, प्रशासन व लोकसहभाग यांच्यामार्फत नद्यांवर बंधारे बांधण्यात येत
आहेत. या उपक्रमात आपलेही काहीतरी वैयक्तिक दायित्व असावे या भावनेने
प्रेरित होऊन चिपळूण तालुक्यातील उमरोली येथील ग्रा.पं. सदस्य संतोष
भडवळकर यांनी स्वखर्चाने व काही सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या गावातील
नदीवर भराडेवाडी नदीवर बंधारा बांधून सामाजिक बांधिलकी जोपसली आहे.
उमरोली गावचे माजी सरपंच व सध्याचे सदस्य असलेल्या संतोष भडवळकर यांनी
सरपंच पदाच्या कारकिर्दीत गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली.
उपक्रमही राबविले. सामाजिक कार्याची अधिक आवड असल्याने त्यांचा पिंड
त्यांना स्वस्थ बसून देत नाही. ग्रामस्वच्छता अभियान, गाव-वाड्यांतील
रस्त्यालगतची झाडी तोडणे, रस्त्यांवरील खड्डे भरणे, शाळांना मदत करणे अशी
सामाजिक कामे हाती घेऊन त्यांनी पंचक्रोशीमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण
केला आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती
घेतला. उमरोली भराडेवाडी पुलाजवळील नदीवर त्यांनी जांभ्या दगडाचा पक्का
बंधारा बांधून मोठ्या प्रमाणात पाणी अडवले आहे. या बंधाऱ्याला काही
झरोकेही ठेवले आहे. सिमेंटच्या पक्क्या बंधाऱ्यांमध्ये जेवढे पाणी साचते
त्याहीपेक्षा जास्त पाणी अडवण्याचे काम त्यांनी आपल्या युक्तीने केले
आहे. स्वतः डोक्यावरुन जांभा दगड वाहून आणून त्यांनी हा बंधारा बांधला.
याकामी त्यांना सुभाष भडवळकर, संजय गांधी, भरत खेडेकर यांनी सहकार्य
केले.













