खेड तालुक्यात भाजप संघटन मजबूत करण्याची जबाबदारी; कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
खेड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका प्रभारीपदी विजय दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते भाजप कामगार आघाडीच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजकपदी कार्यरत असून, आता त्यांच्याकडे खेड तालुका प्रभारीपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या दुहेरी नियुक्तीमुळे खेड तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी विजय दरेकर यांना नियुक्तीपत्र देऊन खेड तालुका प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली. पक्ष संघटनेतील त्यांचे योगदान, सामाजिक क्षेत्रातील सक्रियता आणि कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क यांची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
विजय दरेकर हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच सहकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. सामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणे आणि विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग नोंदविणे, यामुळे त्यांची खेड परिसरात कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. कामगार आघाडीच्या जिल्हा संयोजकपदाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मांडणे, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
आता खेड तालुका प्रभारी म्हणून भाजपची संघटना अधिक मजबूत करणे, मंडल आणि बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी करणे, नवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची तयारी मजबूत करणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. तालुक्यातील विविध मंडल, बूथ कमिट्या, आघाड्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन संघटनात्मक कामाला गती देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
या नियुक्तीबद्दल विजय दरेकर यांचे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी अनिकेत कानडे, आबा जोशी, संजय बुटला, रोहन राठोड, संजय विचारे-पाटील यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. खेड तालुक्यात भाजप संघटनेला त्यांच्या नेतृत्वातून अधिक बळ मिळेल आणि पक्षाचा जनसंपर्क वाढेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीबद्दल विजय दरेकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानत, खेड तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे करण्याचा तसेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. खेड तालुक्यात भाजप संघटनात्मक बांधणीला नव्या गतीने सुरुवात होण्याच्या दृष्टीने विजय दरेकर यांची ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.













