खेड तालुक्यातील जामगे येथे गणेशोत्सवानिमित्त सिद्धेश कदम यांची उपस्थिती
खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी खेड तालुक्यातील जामगे येथील आपल्या मूळ गावी भेट देत घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला.
जामगे येथे गणेशोत्सव पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत असल्याचे यावेळी दिसून आले. अनेक ठिकाणी भजन-कीर्तनाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जात असून, डीजे किंवा मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरचा वापर टाळण्यात आला आहे. त्यामुळे गावातील गणेशोत्सवाला पारंपरिक आणि शांततामय स्वरूप प्राप्त झाले आहे.
यावेळी डी जे बाबत बोलताना सिद्धेश कदम म्हणाले, “याबाबत यापूर्वीच खूप काही बोलले गेले आहे. आपण सगळे पाहत आहात, मी माझ्या मूळ गावी जामगे येथे आहे. येथे केवळ भजन-कीर्तनाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कुठेही डीजे नाही, लाऊडस्पीकर नाही किंवा कोणताही मोठा आवाज नाही. जर आपण आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला, तर डीजेचा प्रश्नच उद्भवत नाही.”
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून, पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यावर कदम यांनी यावेळी भर दिला. भक्ती, भजन-कीर्तन आणि सामाजिक सलोखा यामधूनही गणेशोत्सव उत्साहात साजरा करता येतो, असा संदेश जामगे येथील उत्सवातून देण्यात आला.
सिद्धेश कदम यांच्या जामगे भेटीमुळे ग्रामस्थांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. त्यांनी विविध घरांमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन गणरायाचे आशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थ आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.











