देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव तिठा येथे गस्त घालत असताना गुरांची अवैध वाहतूक करणारी गाडी साखरपा पोलिसांनी पकडली. ही कारवाई दि. २४ रोजी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गणपती सावंत (वय ३९, रा. येळाने, ता. शाहूवाडी) हा आपल्या ताब्यातील एम एच ०७ पी ३६१६ क्रमांकाच्या पिकअपमधून २५ हजार रुपये किमतीची गुरे घेऊन मुंडे तर्फे सावर्डे येथून येळाने (ता. शाहूवाडी) कडे जात होता.
दरम्यान, कोंडगाव तिठ्यावर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजित पाटील गस्त घालत असताना ही गाडी त्यांच्या निदर्शनास आली.पोलिसांनी वाहनाची तपासणी केल्यानंतर अवैध वाहतूक उघडकीस आली. त्यानंतर मनस्वी पावसकर यांनी गाडीसह गुरे ताब्यात घेऊन साखरपा पोलीस दूरक्षेत्रात आणली आणि संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव करीत आहेत.













