बांदा स्टँड ते पोलीस चेकपोस्ट पर्यंत सर्व्हिस रोड करा

पं. स. सदस्य ऋतिका नाईक यांची मागणी 

बांदा : प्रतिनिधी 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांदा एसटी स्टँड ते बांदा पोलीस चेक पोस्ट या दरम्यान स्वतंत्र सर्व्हिस रोड तयार करावा, अशी मागणी बांदा पंचायत समिती सदस्य सौ. ऋतिका नाईक यांनी हायवे विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडी कार्यालयाचे शाखा अभियंता रुपेश कांबळे यांना दिले.

 

निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गावरील या भागातून स्थानिक नागरिक, वाहनचालक, शेतकरी आणि पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. प्रवास करताना स्थानिक नागरिकांना तसेच शेतीची अवजारे घेऊन जा-ये करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या महामार्गावरील वाढती वाहतूक, वाहनांचा वेग आणि स्थानिक वाहतुकीची वर्दळ पाहता येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही अनेक वेळा येथे अपघात झाले आहेत. त्यामुळे बांदा शहराच्या सोयीच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या पट्ट्यात स्वतंत्र सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

 

यावेळी मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, निखिल मयेकर, विठ्ठल वाळके, ओमकार नाडकर्णी उपस्थित होते.