श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

सावंतवाडी :दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाला हजारो भाविकांच्या साक्षीने अत्यंत भक्तिमय आणि चैतन्यदायी वातावरणात प्रारंभ झाला. “आई माऊलीचा उदो उदो” अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून, दर्शनासाठी महाराष्ट्रासह शेजारील गोवा आणि कर्नाटक राज्यांतूनही भाविकांचा अथांग जनसागर सोनुर्ली नगरीत लोटला आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात बुधवारी पहाटे अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. उत्सवमूर्तीवर पहाटे दुग्धाभिषेक व शास्त्रोक्त विधिवत पूजन करून महानैवेद्य अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर देवीचे दर्शन भक्तांसाठी खुले करण्यात आले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गाभाऱ्यात देवीची ओटी भरणे आणि केळी अर्पण करण्यासाठी भक्तांची मोठी झुंबड उडाली होती.
दुपारनंतर ही गर्दी अधिकच वाढत गेली, तर सायंकाळी आणि रात्री लोटांगणापूर्वी संपूर्ण मंदिर परिसर भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघाला. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून देवस्थान कमिटीने मंडपाची उत्तम व्यवस्था केली होती. तसेच पोलीस प्रशासन, देवस्थान कमिटी आणि स्थानिक भक्त मंडळाच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध नियोजन केल्यामुळे सर्व भाविकांना अत्यंत सुलभतेने देवीचे मुखदर्शन घेता आले.
भाविकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी सावंतवाडी एसटी आगारातून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे गाड्या भरून भाविक सोनुर्लीत दाखल होत होते. जत्रोत्सवानिमित्त माऊलीच्या प्रांगणात व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटली आहेत. केळी, फुले, पूजेचे साहित्य यांसह कोकणची ओळख असणाऱ्या सुप्रसिद्ध मालवणी खाज्याची दुकाने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांसोबतच परप्रांतीय व्यापाऱ्यांनीही येथे मोठी गर्दी केली असून खेळणी, गृहोपयोगी वस्तू, आइस्क्रीम आणि ज्वेलरीच्या स्टॉल्सवर खरेदीसाठी भक्तांची मोठी रेलचेल दिसून येत आहे.
या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिरात आकर्षक फुलांची आरास आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी या झगमगाटात माऊलीचे मंदिर अधिकच तेजस्वी दिसत असून, गावातील प्रत्येक घरावरही विद्युत रोषणाई केल्याने संपूर्ण सोनुर्ली नगरीत एक प्रकारचे नवचैतन्य संचारले आहे.
*सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी घेतले दर्शन*
सोनुर्ली माऊलीच्या भक्तिमय जत्रोत्सव सोहळ्यानिमित्त राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सर्वपक्षीय मान्यवरांनीही हजेरी लावून देवीचे आशीर्वाद घेतले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी सकाळी देवीचे दर्शन घेतले, यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले यांनी सहकुटुंब उपस्थित राहून माऊलीची मानाची ओटी भरली. याशिवाय भाजपचे युवा नेतृत्व विशाल परब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब, माजगाव विभागाचे जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी माऊलीच्या चरणी लीन होऊन दर्शन घेतले आणि उपस्थित भाविकांना जत्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.












