सावंतवाडी:
देवसू आणि दाणोली परिसरात सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या विशेष छापामारीत ४ बिगरपरवाना बेकायदेशीर बंदुका आणि खवले मांजर या संरक्षित प्राण्याचे १५४ खवले जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही संशयित आरोपींना न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ३ विशेष पथकांनी देवसू पलीकडचीवाडी, जाधववाडी आणि दाणोली गावठणवाडी या भागात ही धडक कारवाई केली होती. या धाडसत्रात पोलिसांनी सुमारे ७० हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता.
या कारवाईदरम्यान आरोपी गजानन उर्फ अर्जुन सावंत, अशोक सावंत, संतोष जाधव आणि सुरज सावंत या चौघांवर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता, प्रकरणाच्या पुढील सखोल चौकशीसाठी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.












