चिपळूण (प्रतिनिधी) : प्रतिष्ठेचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार गौरव सोहोळा नुकताच ठाणे येथील तृप्ती बँक्वेट हॉलमध्ये अतिशय उत्साहात संपन्न झाला. चिपळूण येथील सुरेश दामोदर गद्रे ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका संगीता जोशी यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
या गौरव सोहळ्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे, सौ. निलिमा डावखरे, शिक्षक मतदार संघ कोकण विभागाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. स्व. वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग यांच्यावतीने कोकण विभागातील ठाणे,पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. त्यामुळे कोकणातील शैक्षणिक वर्तुळात हा पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो. यावर्षी प्राध्यापिका संगीता जोशी यांना हा पुरस्कार मिळाला. संगीता जोशी सुरेश दामोदर गद्रे ज्युनियर कॉलेजमध्ये गेली १६ वर्षे मराठी विषयाच्या अध्यापनाचे काम करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देणारा कॉलेजचा सांस्कृतिक विभागही उत्तम सांभाळतात. स्वतः जागतिक स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक पटकावलेल्या संगीता जोशी अशा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या भाषणांचे संकलित असे ‘सन्माननीय व्यासपीठ’ हे त्यांचे पुस्तक गेल्या वर्षी दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केले. वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरत आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या त्या संचालक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यासपीठ,रंगमंच त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. विविध विषयांवर लेखन, सूत्रसंचालन, परीक्षणही करतात.
आपल्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आमची परशुराम एज्युकेशन सोसायटी ही संस्था, माझे सर्व सहकारी शिक्षक, माझे विद्यार्थी, प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे साथ देणाऱ्या माझ्या कटुंबियांचाही सन्मान आहे, असे कृतज्ञतापूर्वक त्यांनी सांगितले. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने चिपळूणमध्ये सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.













