सोनुर्ली श्री देवी माऊलीच्या चरणी भक्तीचे लोटांगण 

हजारो भाविकांनी लोटांगण घालून फेडला नवस

दक्षिण कोकणच्या प्रतिपंढरपुरात ‘आई माऊली’ चा जयघोष

सावंतवाडी । सचिन रेडकर : निसर्गसंपन्न कोकणच्या भूमीत भक्ती आणि श्रद्धेचा अद्वितीय संगम घडवून आणणाऱ्या ‘दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर’ सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवात बुधवारी रात्री भक्तीचा अक्षरशः महासागर उसळला होता. ‘आई माऊली उदयो’च्या गगनभेदी जयघोषात हजारो पुरुष व महिला भाविकांनी सोनुर्ली ‘ बाये ‘ च्या चरणी लोटांगण घालून आपला नवस फेडला. दोन दिवस चाललेल्या या मंगलमय सोहळ्यात गुरुवारी आगळ्यावेगळा तुलाभार संपन्न झाला. नवस केलेल्या भाविकांनी आपल्या वजना एवढे धान्य तसेच इतर वस्तू यांची तुला करून ते माऊलीला अर्पण केले. आज सोहळा पाहण्यासाठी देखील भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा दोन दिवसीय लोटांगणाचा जत्रोत्सव हा कोकणातील भाविकांच्या श्रद्धेचे सर्वोच्च स्थान मानले जाते. बुधवारी सकाळपासूनच मंदिराकडे येणारे सर्व रस्ते भाविकांच्या पावलांनी फुलून गेले होते. दिवसभर असलेली भक्तांची मांदियाळी रात्री आठ वाजेनंतर अथांग जनसागरात रूपांतरित झाली. रात्री ठीक अकरा वाजता ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीत देवीची पालखी कुळघरातून मंदिरात दाखल झाली. पालखीचे आगमन होताच दिवसभर सुरू असलेला दर्शन आणि ओटी-केळी अर्पण करण्याचा विधी थांबवून पारंपरिक पद्धतीने मुख्य लोटांगण सोहळ्याला प्रारंभ झाला.

मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून या अद्भुत सोहळ्याची सुरुवात झाली. नवसकरी पुरुष भाविकांनी जमिनीवरून अंग लोटत तर महिला भाविकांनी उभ्याने चालत संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून आपले लोटांगण पूर्ण केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. लोटांगण सोहळा सुरू होताच श्री देवी माऊलीच्या अवसारांनी तरंगकाठीसह भक्तांना दर्शन दिले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण अधिकच भारावून गेले होते. तब्बल दोन तास पुरुषांची आणि त्यानंतर महिलांची अशी अडीच ते तीन तास चाललेली ही भक्तीची परिक्रमा हजारो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवली. लोटांगण घालणाऱ्या भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे सरसावले होते, तर गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.

जत्रोत्सवाचा दुसरा दिवस परंपरेनुसार गावातील गावकरी मंडळी आणि केळीकुळातील भाविकांसाठी राखीव असतो. गुरुवारी सकाळपासूनच स्थानिक ग्रामस्थांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. यासोबतच येथील प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या ‘तुलाभार’ विधीसाठीही भाविकांची मोठी रांग लागली होती. आपल्या आयुष्यातील अडीअडचणी दूर व्हाव्यात यासाठी भाविकांनी स्वतःच्या वजनाइतक्या वस्तू देवीचरणी अर्पण करून नवस फेडले. त्यानंतर पिशाच्च बाधा किंवा इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या भक्तांचे निवारण देवीच्या अवसारी संचाराकडून करण्यात आले.

 

*वाहतुकीचे चोख नियोजन…*

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे चोख नियोजन केल्याने संपूर्ण जत्रोत्सवात काहीच अडचण व अनुचित प्रकार घडला नाही. अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेअभावी काही ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी वगळता संपूर्ण जत्रोत्सव सुरळीत पार पडला.

 

*एसटीकडून चांगली सेवा*

सोनुर्ली जत्रोत्सवाला दरवर्षी एसटी महामंडळाकडून जादा बस फेऱ्या सोडल्या जातात. यावर्षीही एसटीकडून प्रवाशांकरिता उत्तम सोय केली होती. त्यामुळेच भाविकांना सोनुर्लीत दाखल होऊन देवीचे दर्शन घेणे सोपे झाले. अनेकांनी एसटीच्या या सोयीबाबत समाधान व आनंद व्यक्त केला.

 

*व्यापाऱ्यांची मोठी उलाढाल…*

सोनुर्ली जत्रोत्सवावर पावसाचे सावट असल्याने व्यापारी वर्गातून भीती व्यक्त होत होती. सायंकाळी पावसाच्या काही सरीही कोसळल्या; मात्र संपूर्ण जत्रोत्सव पार पडेपर्यंत पावसाचे मोठे विघ्न न आल्याने व्यापाऱ्यांचा व्यवसाय उत्तम होऊन मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत व्यापाऱ्यांची ही आर्थिक उलाढाल सुरू होती.