आम सभेत लांजा पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह
लांजा( प्रतिनिधी) : लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारू धंदे सुरू आहेत. मात्र या दारू धंद्यांबाबत पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती दिली तर कारवाई होण्याअगोदर त्याबाबतची माहिती संबंधित दारू धंदेवाले यांना पाच मिनिटे अगोदर मिळते, असे
सांगत कोट गावचे सरपंच संजय पाष्टे यांनी बुधवारी पार पडलेल्या आमसभेत लांजा पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
गेल्या काही महिन्यापासून लांजा तालुक्यात दारू धंदे बोकाळले आहेत. गावठी दारू ची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. कोट, रिंगणे सह अन्य गावांमध्ये बिन बोभाट पणे गावठी दारूची विक्री होत आहे. मात्र या दारू धंदेवाल्यांना नेमके अभय कोणाचे? झारितला शुक्राचार्य कोण ?असा प्रश्न पुढे आला आहे. याचे कारण म्हणजे कोट गावचे सरपंच पाष्टे यांनी उपस्थित केलेला प्रश्न. बुधवारी झालेल्या आमसभेत सरपंच पाष्टे यांनी सांगितले की, गावात बिनधास्तपणे दारू धंदे सुरू आहेत. याबाबतची माहिती लांजा पोलिसांना दिली तर कारवाई होण्या अगोदरच संबंधित दारू धंदेवाल्याला तुझ्यावर कारवाई होणार आहे हे पाच मिनिटे अगोदर समजते. त्यामुळे साहजिकच या कारवाईपूर्वी आपला दारूचा माल योग्य जागी लपवून ठेवण्यात तो यशस्वी होतो. केवळ थातूरमातून शंभर दोनशे रुपयांची दारू कारवाई सापडते.
म्हणजेच कारवाई होणार हे त्यांना पाचव्या मिनिटाला कसे काय समजते? असा प्रश्न उपस्थित करत संजय पाष्टे यांनी लांजा पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच जर दारूबंदी सुरू असतील तर पोलीस पाटील काय करतात? त्यामुळे हे गावठी दारू धंदे बंद झाले पाहिजेत अशी मागणी सरपंच पाष्टे यांच्यासह रिंगणे सरपंच संजय आयरे यांनी देखील केली.
आमदार किरण सामंत यांच्या समोरच लांजा पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने सर्वजण अवाक झाले. मात्र यावेळी आमदार किरण सामंत यांनी दारू धंदेवाल्यांवर कारवाई करण्याचे सूचना पोलिसांना दिल्या.













