अतिक्रमण हटाव मोहीम भविष्यात अधिक तीव्र करणार : नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले*

 

अतिक्रमणातून होत असलेले अवैध धंद्यांचे अड्डे मुळापासून उखडून टाकणार 

 

सावंतवाडी :

सावंतवाडी शहराच्या कोलगाव नदीवरील अतिक्रमण अटाव कारवाईसंदर्भात सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सदर अतिक्रमण हटाव मोहीम भविष्यात अधिकच तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, “शहराच्या कोलगाव हद्दीवरील ज्या भागात पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे, त्या भागात अतिक्रमण केलेल्या स्टॉलमधून मद्य तसेच इतर काही अवैध वस्तूंची खुली विक्री होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे तो भाग अवैध धंद्यांचा अड्डा बनला होता. बुधवारी त्या ठिकाणी पाहणीसाठी गेलेल्या एका नगरपालिका अधिकाऱ्याच्या पायावर तेथील एका मद्यधुंद व्यक्तीने दगडाने मारहाण केली होती, त्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यामुळे अशा पद्धतीने जर काही चुकीचे होत असेल तर ते मुळापासून उखडून टाकण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. ही मोहीम भविष्यात अधिक तीव्र करण्यात येणार असून स्वच्छ व सुंदर अशी ओळख असलेले सावंतवाडी शहर अधिक सुंदर करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.”