फोंडाघाट ज्येष्ठ नागरिकांना प्रामाणिकपणे मदत/ सहकार्य करण्यासाठी शासन कटिबद्ध– गटविकास अधि. अरुण चव्हाण.

जिल्हा/तालुका ज्येष्ठ नागरिक सेवा संघाकडून फोंडाघाट ” विरंगुळा केंद्र ” चा प्रस्ताव शासनाला देणार– राजस रेगे

फोंडाघाट मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद !

फोंडाघाट/कुमार नाडकर्णी–ज्येष्ठ नागरिकांना या वयात जगण्याची ऊर्जा देणारे आणि निरामय आरोग्यसह गत आयुष्यातील सुखदुःखाच्या आठवणीपासून मुक्तता देणारे,विरंगुळा केंद्र हा शासनाने बहाल केलेला हक्क आहे. त्यासाठी शासनाचे गटविकास अधिकारी, ज्येष्ठ नागरिक जिल्हा- तालुका संघाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत यांनी मनावर घेऊन ग्रामपंचायत नजीकची शासकीय धर्मशाळा इमारतीची जागा ताब्यात घेऊन, त्या ठिकाणी जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करावे.आणि दिलासा द्यावा अशी विनंती जेष्ठ नागरिकांच्या वतीने संयोजक आबू पटेल यांनी आपल्या आभार प्रदर्शनातून व्यक्त केली..

 

 

ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज सभागृह आबु पटेल आणि ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून फोंडाघाट पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांची सभा प्रचंड उपस्थितीत पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष राजस रेगे, तालुकाध्यक्ष अर्जुनराव राणे, जिल्हा सचिव सखाराम सपकाळ, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, फोंडा सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तनवी मोदी, ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे, माजी सभापती सुजाता हळदीवे,रमेश मेस्त्री, भाई भालेकर, आबू पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सुसूत्रसंचलन संतोष टक्के यांनी केले.

 

 

यावेळी माजी ज्येष्ठ शिक्षक सुरेश पेडणेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात, सर्वांचे स्वागत करून, शासनाने साठ वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी, सामाजिक हक्क व सहभागासाठी गांभीर्याने विचार करून, योजना व सुविधा कार्यान्वित केल्या आहेत. त्यासाठी जेष्ठ नागरिक कार्ड,आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, पोलीस, फसवणूक, प्रवास, यासाठी हेल्पलाइन नंबर, आयुष्यमान भारत रुग्णालय, शासकीय रुग्णालय, प्रवास सवलत, मुख्यमंत्री वयोश्री योजना, श्रावण बाळ- संजय गांधी निराधार योजना, विविध अनुदान, बचत योजना, अभ्युदय योजना अंतर्गत वृद्धाश्रम- पोषणाची सोय- वैद्यकीय सेवा -विरंगुळा केंद्र इत्यादी योजनांची सविस्तर माहिती दिली.

 

 

आपल्या भाषणात माजी सभापती सुजाता हळदीवे यांनी या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करून, फोंडाघाट मधील ज्येष्ठ नागरिकांना प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे अस्वस्थ केले. फोंडाघाट संघाकडून येणाऱ्या प्रस्तावावर प्रशासनाकडून सर्व प्रकारचे प्रामाणिक सहकार्य करण्याचे तसेच विरंगुळा केंद्राचा प्रस्ताव आल्यास, सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी दिली. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हा सचिव सखाराम सपकाळ, तालुकाध्यक्ष अर्जुनराव राणे, आणि जिल्हाध्यक्ष राजस रेगे यांनी संयोजकांचे कौतुक करून, उपस्थित तमाम जेष्ठ नागरिकांना या एकत्र येण्याची आजच्या समाजामधील गरज विशद केली. जिल्हा तालुका संघाकडून फोंडाघाट ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काच्या योजना, सुविधा मिळवून देण्याची आणि अडचणी दूर करण्याची तसेच तातडीने “विरंगुळा केंद्र” साठी जनतेची आग्रही मागणी लक्षात घेऊन प्रस्ताव शासनाला सादर करण्याची ग्वाही दिली. सरपंच संजना आग्रे व उपसरपंच तन्वी मोदी यांनी, फोंडा ग्रामपंचायत द्वारे गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी करीत असलेल्या कामाची माहिती दिली आणि सदैव सहकार्याचे आश्वासन दिले..

 

 

फोंडाघाट मध्ये विविध स्वयंसेवी संस्था,विकास सेवा संस्था, ठेकेदार, शिक्षक- पालक, आरोग्य रक्षक- सेविका, कर्मचारी, जाती-जमातीच्या संस्था आपापल्या परीने काम करीत असताना, आज गांभीर्याने प्रत्येक कुटुंबातील ज्वलंत विषय– म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे कोणच लक्ष दिले जात नाही. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या अत्यंत उपयुक्त आणि अत्यावश्यक असलेल्या सुविधा योजना ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्याकरिता स्वप्नवत वाटणारे व्यासपीठ संयोजकांच्या अथक प्रेरणातून आज फोंडाघाट मध्ये उपलब्ध होत असल्याचा आनंद उपस्थित जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केला….