केंद्रशाळा गुहागर नं. २ येथे शिक्षण परिषद

गुहागर प्रतिनिधी:
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, गुहागर नं. २ येथे आयोजित शिक्षण परिषद अत्यंत उत्साहपूर्ण, खेळीमेळीच्या आणि अभ्यासपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास, शिक्षकांचे व्यावसायिक सक्षमीकरण, शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि बदलत्या शैक्षणिक धोरणांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविणे, हा या शिक्षण परिषदेचा प्रमुख उद्देश होता.
या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते तथा आदर्श शिक्षक श्री. चंद्रकांत झगडे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली.यावेळी केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील, अपग्रेड मुख्याध्यापक श्री. ईश्वर वसावे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. तेलगडे, नगरसेविका तथा स्थानिक प्रतिनिधी सौ. स्वरा तेलगडे, मुख्याध्यापिका सौ. मनीषा शिंदे, अरे देव रहाटे शाळेचे मुख्याध्यापक मथुवेल गावित, गुहागर उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बागवान, आरे भंडारवाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री. किशोर वाघ, असगोली नं. २ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रियांका शिंदे, गुहागर हायस्कूलचे प्रतिनिधी श्री. मधुकर गंगावणे, अन्नपूर्णा विद्यालयाचे प्रतिनिधी श्री. संजय गमरे यांच्यासह विविध शाळांतील शिक्षक उपस्थित होते.शिक्षण परिषदेमध्ये विविध विषयांवर तज्ज्ञ शिक्षकांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. श्री. दिनेश जानवळकर यांनी ऑनलाइन शैक्षणिक कामकाज, यू-डायस, संचमान्यता आदी महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करून शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. असगोली नं. १ शाळेच्या शिक्षिका सौ. दीक्षा गुरव यांनी अध्ययन निष्पत्ती वर आधारित मासिक नियोजनाचे महत्त्व आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी याविषयी मार्गदर्शन केले.’रीड टू रूम’ या उपक्रमांतर्गत श्री. राकेश रामटेके यांनी वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी शिक्षकांनी करावयाच्या प्रयत्नांची माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ‘व्यावसायिक शिक्षण’ या विषयावर श्री. राजू सुर्वे यांनी सविस्तर विवेचन केले. त्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे आकर्षक प्रदर्शनही यावेळी मांडण्यात आले. कार्यानुभव विषयाची उद्दिष्टे, महत्त्व आणि अभ्यासक्रमातील स्थान याविषयी श्री. मथुवेल गावित यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.एक भारत श्रेष्ठ भारत’मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि शालेय स्तरावर त्याची अंमलबजावणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शैक्षणिक प्रशासन, शिक्षकांची जबाबदारी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवरही त्यांनी विचार मांडले.यावेळी अपग्रेड मुख्याध्यापक श्री. ईश्वर वसावे यांनी संपूर्ण शिक्षण परिषदेचा आढावा घेताना सर्व विषयांवर अत्यंत दर्जेदार आणि उपयुक्त माहिती मिळाल्याचे सांगितले. अशा परिषदांमुळे शिक्षकांना नवनवीन शैक्षणिक संकल्पना समजतात, अनुभवांची देवाणघेवाण होते आणि शाळांच्या गुणवत्ता विकासाला निश्चितच चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. चंद्रकांत झगडे यांनी शिक्षण परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षण परिषदेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासाला गती मिळते असे त्यांनी प्रतिपादन केले. शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी गुहागर नं. २ शाळेचे मुख्याध्यापक मनीषा शिंदे, शिक्षकवृंद स्नेहा लोंढे, निधी सावंतआणि विशेष शिक्षक श्री. शिवानंद साखरे यांनी या परिषदेच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हरहुन्नरी शिक्षक श्री. अमोल धुमाळ यांनी केले.
विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन, अनुभवांची देवाणघेवाण आणि सकारात्मक विचारमंथन यांमुळे ही शिक्षण परिषद शिक्षकांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली. केवळ औपचारिक व बैठक न राहता विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी दिशा देणारा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.