राष्ट्रीय दिव्यांग पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
माडखोल । लखन आडेलकर :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधिमंडळामध्ये दिव्यांग व्यक्तींना हक्काचे राजकीय आरक्षण व प्रतिनिधित्व मिळावे, या मागणीसाठी ‘राष्ट्रीय दिव्यांग पार्टी’च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय देसाई यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन सादर केले असून, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
सध्या राज्यात शिक्षण आणि नोकरीमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षण लागू आहे. मात्र, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांना राजकीय प्रतिनिधित्व नाही. परिणामी, दिव्यांगांच्या विकासासाठी राखीव असलेल्या निधीचे योग्य नियोजन होत नाही आणि शासकीय धोरणांची प्रभावी अंमलबजावणीही रखडली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६’ च्या मूलभूत तत्त्वानुसार दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि समान संधी देण्यासाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीने सरकारकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिव्यांग प्रवर्गासाठी किमान ५ टक्के स्वतंत्र राजकीय आरक्षण लागू करावे तसेच जोपर्यंत कायदेशीर आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांग व्यक्तीची ‘स्वीकृत सदस्य’ (नामनिर्देशित सदस्य) म्हणून नियुक्ती करणे बंधनकारक करावे आणि राज्याच्या विधिमंडळात (विधानसभा व विधानपरिषद) दिव्यांगांचे प्रश्न मांडण्यासाठी दिव्यांग प्रतिनिधींची नियुक्ती करावी अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. राज्य शासनाने राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांच्या या न्याय्य हक्कांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा, आगामी काळात राष्ट्रीय दिव्यांग पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष संजय देसाई यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.या प्रसंगी त्यांच्यासोबत पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. मनोज सातोसे, जिल्हा सचिव श्री. भरत परब,खजिनदार श्री. रोशन घाडी , दिव्यांग कार्यकर्ते श्री. सत्यम पाटील,सौ. जोत्स्ना राणे, सौ.वैशाली कांबळे,सौ.प्रियांका शिंदे,श्री.प्रितम माधव,नानासो शिंदे आणि राष्ट्रीय दिव्यांग पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.












