रेडी बंदराला जोडणाऱ्या मळगाव ते रेडी रस्त्यासाठी ३०० कोटी मंजूर

शक्तिपीठ महामार्गामुळे मळगाव ठरणार जंक्शन: आ. दीपक केसरकर

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
रेडी बंदराला जोडल्या जाणाऱ्या मळगाव ते आरोंदा आणि आरोंदा ते रेडी या मार्गाला मंजुरी मिळाली असून, या रस्ता कामासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शक्तिपीठ महामार्ग मळगाव येथे जोडला जाणार असल्याने मळगाव हे एक महत्त्वाचे ‘जंक्शन’ बनणार आहे, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली.

सावंतवाडी येथील निवासस्थानी आयोजित ​पत्रकार परिषदेत बोलताना आमदार केसरकर म्हणाले की, मळगाव-रेडी रस्त्यामुळे भागातील वाहतूक आणि व्यापाराला मोठा वेग मिळणार आहे. शक्तिपीठ महामार्गाचा रेडी बंदरासाठीचा कनेक्टर मळगाव मार्गे नेण्याचे नियोजन आहे. यासोबतच चौकुळ आणि आंबोलीलाही कनेक्टर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. चौकुळवरून येणारा हा मार्ग शक्तिपीठ महामार्गाला आणि पुढे दोडामार्ग रस्त्याला जोडून गोवा राज्यात प्रवेश करेल. हा रस्ता सिंधुदुर्गात आल्यानंतर लोक नॅशनल हायवेने गोव्यात जाऊ शकतील. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार असून त्यात अंतिम मंजुरी मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​या नव्या महामार्ग जाळ्यामुळे सावंतवाडीसह कुडाळ, कणकवली, मालवण आणि देवगड येथील पर्यटन स्थळांना मोठा दिलासा मिळणार असून पर्यटनाला नवी चालना मिळेल. कोकण एक्स्प्रेस-वे, कोस्टल रोड आणि नॅशनल हायवे हे तिन्ही महत्त्वाचे मार्ग या रस्त्याला जोडले जाणार असल्याने जिल्ह्याच्या प्रगतीची नवी दिशा उघडेल.

​वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मळगाव बाजारपेठ वगळून वेत्ये बाजूने असलेल्या पर्यायी मार्गाचा विचार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संकेश्वर ते बांदा नॅशनल हायवे मुंबई-गोवा महामार्गाला जोडला जाईल, तर सागरी महामार्ग आणि कोकण एक्स्प्रेस महामार्गदेखील मळगाव ते रेडी रस्त्याला जोडले जातील. या रस्त्यांच्या भक्कम जाळ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण आणि पर्यटन विकास वेगाने होईल, असा विश्वास आमदार केसरकर यांनी व्यक्त केला.