व्यापारी संघाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
राजापूर प्रतिनिधी : राजापूर शहरातील बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्याची मोहीम शासनाच्या आदेशानुसार सुरू असताना, व्यापाऱ्यांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राजापूर तालुका व्यापारी संघाने केली आहे. याबाबत संघाच्या वतीने मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांना निवेदन देण्यात आले आहे.
राजापूर शहरातील बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला व्यापारी संघाचा विरोध नसल्याचे स्पष्ट करतानाच, बाजारपेठेची भौगोलिक परिस्थिती आणि व्यापाऱ्यांच्या दैनंदिन व्यवसायाचा विचार करून ही कारवाई नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावी, अशी भूमिका संघाने मांडली आहे.
बाजारपेठेतील वाढीव बांधकामे काढून टाकण्यास आपला विरोध नसल्याचे संघाने नमूद केले आहे. मात्र, दुकानदारांना ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी झडीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी बाजारपेठेत किमान १२ फूट व त्यावरील झडी असावी, तसेच पावसाळ्यात व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये आणि अग्निशमन बंबाच्या येण्या-जाण्यात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आकाराने लहान अग्निशमन बंब खरेदी करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने आणि मालवाहू वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांना दुचाकी पार्किंगची स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रहदारीला अडथळा होईल अशा प्रकारे दुकानांच्या बाहेर माल लावू नये, असे आवाहन व्यापारी संघाने आपल्या सदस्य व्यापाऱ्यांना केले असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे
याशिवाय बाजारपेठेतील अनावश्यक इलेक्ट्रिक वायर्स, टेलिफोन वायर्स, टीव्ही केबल, इलेक्ट्रिक पोल आणि टेलिफोन पोल हटविण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.













