लांजा( प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी येथे अपघातांच्या वाढत्या घटनांविरोधात रास्तारोको आंदोलन छेडणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सात पदाधिकाऱ्यांविरोधात लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही महामार्गावर आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी अंजणारी बसस्थानक परिसरात शिवसेनेच्या आंदोलना दरम्यान दुपारी १२.१५ ते १२.२५ या वेळेत रास्ता रोको करण्यात आले. यावेळी पक्षाचे सुमारे १०० ते १२० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलकांनी महामार्गाच्या दोन्ही मार्गिकांवर ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक रोखली गेली. यामुळे रत्नागिरीचे अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशासह पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) व (३) अन्वये लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्तात्रय जयाराम कदम, उपजिल्हाप्रमुख रविंद्र भार्गव ढोळस, लांजा तालुकाप्रमुख युवराज मारुती हांदे, संगमेश्वर तालुकाप्रमुख नंदादीप ऊर्फ बंड्या नंदकुमार बोरकर, रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत शंकरराव साळुंखे, लांजा उपशहरप्रमुख प्रकाश ऊर्फ बाबू शांताराम गुरव आणि युवासेना लांजा तालुका अधिकारी अभिजित अनिल राजेशिर्के यांचा समावेश आहे.
याप्रकरणी शिवसेना उबाठा पक्षाच्या सात पदाधिकाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास जाधव करत आहेत












