‘घरघर संविधान’ उपक्रमांतर्गत उद्देशिका प्रतिमांचे वितरण
सावंतवाडी : येथील पंचायत समिती कार्यालयात आज, गुरुवारी दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभागृहात उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या वतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना पंचायत समिती सावंतवाडीचे गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी उपस्थितांना भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. यानंतर पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना, भारतीय संविधान प्रत्येक घराघरात लावणे आवश्यक असून त्याचा योग्य तो सन्मान राखत संविधानाच्या चौकटीतच देशाचे राजकारण आणि प्रशासकीय कामकाज सुरू असल्याचे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सुस्मिता जाधव यांनी भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांच्या जतनावर भर दिला. केवळ या संविधानामुळेच मागासवर्गीय समाजातील एका महिलेला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे, अशी कृतज्ञता त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत संविधानातील मूल्ये आणि विचार पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘घरघर संविधान’ या विशेष उपक्रमांतर्गत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला पंचायत समिती सदस्य श्रीमती प्रणाली टिळवे, शरद धाऊसकर, मायकल डिसोजा, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता मंदार जुवेकर, गट शिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्यासह तालुकास्तरीय विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच तालुक्यातील लाभार्थी ग्रामस्थांमध्ये आत्माराम सहदेव साळगांवकर (माजगांव), शुभांगी नागेश ताटे (चराठे), स्नेहा संतोष म्हालटकर (कारीवडे), श्रीमती सुचिता गोविंद माळकर (कारीवडे), श्रीमती रत्नमाला जिवबा वीर (बांदा), श्रीमती सुनिता सिताराम मुळये (बांदा), उमेश तुकाराम राऊळ (कोलगांव), गणपत नाना आंगचेकर (आंबेगांव), दाजी न्हानू तेली (आंबेगांव), श्रीमती दुर्वा देवदत्त पालव (कारीवडे), अक्षय सोमा जाधव (माजगांव), सुरेश केशव सातार्डेकर (आरोंदा) आणि निलेश शशिकांत तारी आदींची विशेष उपस्थिती होती.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे आणि संविधानाबाबत व्यापक जनजागृती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगत कृषी अधिकारी शुभदा सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.













