BREAKING : शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात

खेड–धामणंद मार्गावरील एनवरे येथे खासगी आराम बस पलटी 
अपघातात २५ प्रवासी जखमी, दोन जणांची प्रकृती गंभीर
खेड । राकेश कोळी 

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. खेड–धामणंद मार्गावरील एनवरे येथे बोरिवलीहून सापिर्ली गावाकडे येणारी खासगी आराम बस पलटी झाल्याने या अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली येथून सापिर्ली व धामणंद परिसरातील भाविक शिमगोत्सव आणि ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या गावी येत होते. नेहमीप्रमाणे ही खासगी आराम बस काल रात्री बोरिवलीहून निघाली होती. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बस खेड–धामणंद मार्गावरील एनवरे येथे पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली.
या बसमध्ये एकूण २८ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. बसची समोरील काच फोडून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू असून ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतून अनेक चाकरमानी आणि भाविक आपल्या गावी येत असतात. त्याचदरम्यान हा अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.