मालवण | प्रतिनिधी : भारतीय संविधान दिनानिमित्त मालवण पंचायत समिती येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती शाम झाड, गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधाननिष्ठेची शपथ घेण्यात आली. भारतीय संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूलभूत मूल्ये जपण्याचा तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानातील तत्त्वांचे पालन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून उपस्थितांना भारतीय संविधानाची फ्रेम भेट देण्यात आली.













