धवल क्रांतीच्या दिशेने नेरुरमध्ये महत्त्वाचे पाऊल!

संदेश नाईक व विजय आळवे यांच्या पुढाकारातून ‘कोकण कपिला’ दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेची स्थापना

स्वप्निल कदम-कुडाळ :
ग्रामीण भागातील पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आमदार निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली नेरुर-कुटगाव येथे ‘कोकण कपिला दुग्ध उत्पादक सहकारी संस्था’ स्थापन करण्यात आली आहे. विभागप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक आणि शाखाप्रमुख विजय आळवे यांच्या विशेष पुढाकारातून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

या संस्थेच्या माध्यमातून लवकरच दूध संकलन केंद्र सुरू करण्यात येणार असून, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि गोकुळ दूध संघ यांच्याशी संपर्क साधून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

नेरुर गावासह नेरुर पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क साधून दुग्ध व्यवसायाला चालना देणे, दूध उत्पादनात वाढ करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार आणि उत्पन्नाचे नवे साधन निर्माण करण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार असल्याचे संदेश नाईक आणि विजय आळवे यांनी सांगितले. संस्थेच्या स्थापनेमुळे नेरुर पंचक्रोशीतील पशुपालक शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून, धवल क्रांतीच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.