कीड-रोग व्यवस्थापन, छाटणी तंत्रज्ञान आणि आंबा निर्यातीच्या संधींबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
देवगड : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, देवगड आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २ डिसेंबर २०२६ रोजी देवगडमध्ये ‘क्षेत्रीय किसान गोष्टी’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता जामसंडे येथील कै. मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम होणार असून, यामध्ये आंबा पिकाचे संरक्षण, कीड-रोग व्यवस्थापन आणि निर्यातीच्या संधी याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात रत्नागिरी येथील प्रगतिशील आंबा बागायतदार राजेश श्रीविलास पटवर्धन हे छाटणी (प्रुनिंग) तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. छाटणीच्या योग्य तंत्राचा वापर करून फवारणीचा खर्च कमी करत आंबा उत्पादनात वाढ कशी साधता येईल, याची माहिती ते देणार आहेत.
रामेश्वर येथील आंबा संशोधन उपकेंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज हे आंबा पिकावरील कीड व रोगांचे व्यवस्थापन आणि योग्य फवारणी तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर जीएमआर एअरपोर्ट अथॉरिटीचे सहाय्यक महाव्यवस्थापक विश्राम सबनीस हे आंबा निर्यातीच्या संधी, निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया आणि त्यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण बाबींची माहिती देणार आहेत.
आंबा बागायतदारांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार आंबा उत्पादन घेता यावे आणि निर्यातीच्या माध्यमातून उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी केले आहे.












