वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय तटरक्षक दलामार्फत जनजागृती व करिअर मार्गदर्शन

गुहागर प्रतिनिधी:
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे भारतीय तटरक्षक दलाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त (५० वर्षे) मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी जनजागृती व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशव्यापी जनजागृती मोहिमेअंतर्गत मोबाईल थिएटर व्हॅनच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डेप्युटी कमांडर एन. साई पृथ्वीराज आणि प्रधान यांत्रिक राजकिरण ढवळे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांच्या हस्ते त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्यांनी भारतीय तटरक्षक दलाची भूमिका, जबाबदाऱ्या, सागरी सुरक्षा, किनारपट्टीचे संरक्षण आणि देशाच्या सागरी हितसंबंधांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच दलाच्या विविध मोहिमा व कार्यपद्धतीची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफीत दाखविण्यात आली.
विद्यार्थ्यांना भारतीय तटरक्षक दलातील करिअरच्या संधी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, भरती प्रक्रिया व निवड पद्धती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी स्वतःचे अनुभव सांगून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमाला सुमारे १०६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी कार्यालयीन प्रमुख श्री. ऋषिकेश गोखले, प्रा. अमित जोशी, तेजश्री देव, दिपिका खाचणे व संतोष महाबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वयन प्रा. औदुंबर पाटकर यांनी केले. त्यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय तटरक्षक दलाच्या कार्याची आणि देशसेवेतील करिअरच्या विविध संधींची ओळख झाली.