चिपळूण । प्रतिनिधी : तालुक्यातील खेरशेत येथील बौद्धवाडीत एका घराच्या अंगणात खवले मांजराचे (Indian Pangolin) पिल्लू आढळून आले. वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या पिल्लाची सुरक्षित सुटका केली. पशुवैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी खेरशेत येथील स्वप्निल कदम यांनी प्रताप अविनाश मोहिते यांच्या घराच्या अंगणात खवले मांजराचे पिल्लू आढळल्याची माहिती वनरक्षक नांदगाव यांना दिली. त्यानंतर वन विभागाने तातडीने बचावकार्य हाती घेतले.
परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण एस. एस. खान यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक अश्विनी जाधव, वनरक्षक राहुल गुंठे तसेच RRT पथकाचे सदस्य रितेश घाग आणि मयूर सकपाळ यांनी घटनास्थळी पोहोचून या पिल्लाला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. हे खवले मांजर अंदाजे एक वर्ष वयाचे मादी पिल्लू असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर सावर्डे येथील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत खवले मांजर सुस्थितीत असल्याचे आढळले. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचावकार्य यशस्वीरीत्या पार पडले.
दरम्यान, वन्यजीव हे निसर्गाच्या समतोलासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लोकवस्तीत वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्यांना पकडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभाग, रत्नागिरी (चिपळूण) यांच्याकडून करण्यात आले आहे.












