रत्नागिरी : जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर छोट्या शहरातील तरुणही राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडू शकतो, हे रत्नागिरीच्या आमिर अश्रफ याने सिद्ध केले आहे. ‘एमटीव्ही रोडीज रिबर्थ’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये निवड होणारा तो रत्नागिरीचा पहिलाच स्पर्धक ठरला आहे. या ऐतिहासिक यशामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणचे नाव राष्ट्रीय टेलिव्हिजन आणि ओटीटी विश्वात पोहोचले आहे. हा शो एमटीव्हीसह नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित होत आहे.
रोडीजच्या ‘पर्सनल इंटरव्ह्यू’ फेरीत आमिरने आपल्या प्रभावी संवादशैलीने, बुद्धिमत्तेने आणि कलागुणांनी परीक्षकांची मने जिंकली. त्याच्या या दमदार सादरीकरणावर खुश होऊन त्याला १५,००० रोडियम्स मिळाले. इतकेच नव्हे, तर गँग लीडर बानी जे हिने त्याला ‘स्नॅच’ करत थेट आपल्या टिममध्ये सामील करून घेतले. हा क्षण संपूर्ण रत्नागिरीकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे.
आमिरचा हा प्रवास एका रिअॅलिटी शोपुरता मर्यादित नसून त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. २००८ पासून तो इनलाइन स्केटिंग स्पर्धांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे. लहानपणापासूनच खेळ, नृत्य आणि फिटनेसची आवड जोपासत त्याने स्वतःला घडवले. रोडीजपूर्वी त्याने ‘बॉम्बे टाइम्स फ्रेश फेस’ स्पर्धेत उपविजेतेपद, तर ‘फेस ऑफ मुंबई’ स्पर्धेतही मानाचे स्थान पटकावून मुंबईच्या मनोरंजन विश्वात आपली ओळख निर्माण केली होती. आपल्या जिल्ह्यासाठी काहीतरी करून दाखवण्याच्या त्याच्या या जिद्दीमुळे आज आमिर कोकणातील तरुणांसाठी नवा आदर्श ठरला आहे.














