कणकवलीत मानसिकदृष्ट्या विकलांग युवतीवर धमकावून लैंगिक अत्याचार

संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नोव्हेंबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत अत्याचार केल्याची फिर्याद

संशयित आरोपी पसार

कणकवली : मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या २० वर्षीय युवतीला धमकावून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी शैलेश शशिकांत मेस्त्री (२८, रा. वरवडे सुतारवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी पसार झाला असल्याची माहिती तपासी अंमलदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी दिली.

याबाबत पीडित युवतीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला गोवा राज्यात वास्तव्यास असून, तिची मुलगी कणकवली तालुक्यातील आपल्या मूळ गावी काही कुटुंबीयांसमवेत राहते. काही दिवसांपूर्वी पीडित युवती आईकडे राहण्यासाठी आली होती. यावेळी तिच्या पोटात दुखत असल्याचे आईच्या निदर्शनास आले. त्याबाबत आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिच्यावरील लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. संशयित आरोपी शैलेश मेस्त्री याने नोव्हेंबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत युवतीवर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेने आईला सांगितले. तसेच याबाबत कोणालाही काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने सांगितले. त्यानंतर पीडित युवतीच्या आईने मुलीसह कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान, पीडित युवती गर्भवती नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.