भरधाव रिक्षाची दुचाकीला समोरून धडक; मायलेक गंभीर जखमी

करुळ-घोरपीवाडी येथील अपघात; चुकीच्या बाजूने रिक्षा चालविणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल

कणकवली : करुळ-घोरपीवाडी परिसरात हुंबरट ते फोंडाघाट जाणाऱ्या डांबरी मार्गावर भरधाव ऑटो रिक्षाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील मायलेक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रिक्षाचालक दिगंबर दशरथ दाभोलकर (२२, रा. वडाचापाट-कुळकरवाडी, ता. मालवण) याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सत्यवान धोंडू जाधव (४३, रा. करुळ-घोरपीवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. शुभम अनंत जाधव (२०, रा. करुळ) हे शुक्रवारी सायंकाळी आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून जात होते. त्यांच्या दुचाकीवर मागे आई वंदना अनंत जाधव (४०) बसल्या होत्या. करुळ येथील मधु मंगेश कर्णिक यांच्या घराजवळ ते आले असता, हुंबरटच्या दिशेने फोंडाघाटकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ऑटो रिक्षाने चुकीच्या बाजूने येत त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

या धडकेत शुभम यांच्या उजव्या पायाला, कंबरेला, डोक्याला तसेच शरीराच्या उजव्या बाजूला दुखापत झाली. तर त्यांच्या आई वंदना यांच्या डोक्याला व कपाळाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मायलेकांना मदत केली. त्यानंतर खासगी वाहनातून त्यांना तातडीने कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातप्रकरणी सत्यवान जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भरधाव वेगाने व चुकीच्या बाजूने रिक्षा चालवून दुचाकीला धडक देत मायलेकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.