५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य गटात श्री. दत्ताराम सावंत यांना प्रथम क्रमांक

 

सावंतवाडी : ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२६-२७ मध्ये अध्यापननिर्मित शैक्षणिक साहित्य गटात तांबुळी केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सरमळे शितपचे मुख्याध्यापक श्री. दत्ताराम सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर विभाग, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ, पंचायत समिती सावंतवाडी आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, चराठे-सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ व २८ नोव्हेंबर २०२६ रोजी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी येथे या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावर्षी विज्ञान प्रदर्शनाची थीम ‘शाश्वत आणि विकसित भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष’ अशी होती. या प्रदर्शनात विविध गटांतील विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या वैज्ञानिक कल्पना, प्रयोग आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे सादरीकरण केले. त्यामध्ये श्री. दत्ताराम सावंत यांनी अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी सादरीकरणातून प्रथम क्रमांकाचा मान पटकावला.

श्री. दत्ताराम सावंत यांना गेल्या २० ते २५ वर्षांपासून विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर सातत्याने यश संपादन केले आहे. विज्ञानातील विविध संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या, रंजक व कृतीशील पद्धतीने समजावून सांगण्यासाठी ते सातत्याने नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याची निर्मिती करतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि विज्ञानाविषयी आवड निर्माण होण्यास मोलाचे योगदान मिळाले आहे. त्यांचे ‘विज्ञान रंजन-मनोरंजन’ हे पुस्तकही प्रकाशित झाले असून, विज्ञान शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल सावंतवाडीचे गटशिक्षणाधिकारी श्री. संतोष गोसावी, विस्तार अधिकारी श्री. लक्ष्मीदास ठाकूर, तांबुळी केंद्रप्रमुख श्रीमती ज्योत्स्ना देसाई, सर्व केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री.पांडुरंग काकतकर व मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री. सावंत यांच्या या यशामुळे तांबुळी केंद्र व सरमळे शितप शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या या यशाचे शैक्षणिक वर्तुळातून सर्वत्र कौतुक होत आहे.