एस. टी महामंडळ मात्र साखर झोपेत*
गौरव पोंक्षे |माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे देवरुख आगाराच्या अंतर्गत असलेल्या माखजन बसस्थानक सध्या समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कानाडोळा करत असल्याने शेवटी माखजनवासीय ग्रामस्थानी अखेरीस वर्गणी काढून बस स्थानकाच्या रंग रंगोटीला सुरवात केली आहे.मात्र सध्या एसटी महामंडळ मात्र साखर झोपेत असल्याचे चित्र आहे.माखजन वासियांनी व माखजन ग्रामपंचायतीने घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
काळवंडलेल्या भिंती,बंद असलेले उपगरगृह,अस्वछ प्रसादनगृहे,अस्वछ पाणी,सर्वत्र दुर्गंधी,चिखलमय परिसर,संपूर्ण परिसराचे किलासवाणे वर्णन करावे तेवढे थोडेच.या संपूर्ण बाबींकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील सगळ्या मागण्यांना आत्ता पर्यंत कराची टोपली दाखवण्यात आल्याची माहिती माखजन ग्रामपंचायतीचे सरपंच महेश बाष्टे यांनी दिली.
माखजन बसस्थानक हे दशक्रोशी च्या मध्यभागी असून प्रवाशांची मोठी वर्दळ असते.दिवसागणिक वाढत चाललेल्या गैरसोयींमुळे या बस स्थानकातील प्रवाशांचा पूर ओसरत चालला आहे.आणी ही बाब गंभीर आहे.’प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महामंडळाला आपल्या ब्रीद वाक्याचा विसर पडला की काय असे चित्र माखजन बस स्थानकात आल्यावर दिसत आहे.
करजुवे- मुंबई सारखी जुनी बस फेरी चालू करा अशी माफक मागणी दशक्रोशीतून असून देखील याकडे परिवहन महामंडळ जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सरपंच महेश बाष्टे यांनी केला आहे.
एसटी च्या कुचकामी धोरणामुळे व दुर्लक्ष्यामुळे माखजन दशक्रोशीतील उत्पन्न घटल्याची स्थिति आहे.२०१२ साली माखजन बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले होते.१० वर्षात पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे.१० वर्षे इतक्या अल्पावधीत जर पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असेल तर तेव्हा झालेल्या कामाच्या दर्जा विषयी अधिक सांगण्याची गरज नाही.या कामाची देखील चौकशी व्हायला हवी अशी मागणी परिसरातून होत आहे.
ऑनलाईन आणी गतिमान देशाच्या संकल्पनेत ,माखजन बस स्थानक हे मागासलेल्या स्थितीत आहे.२०१२ साली ‘मी रात टाकली,मी कात टाकली’ असे म्हणणाऱ्या माखजन बस स्थानकाला अगदी १० वर्षात वार्धक्याचा झटका आला की काय असेच म्हणावे लागेल. किंबहुना निकृष्ठ कामा मुळे तो आला असावा.म्हणूनच याची चौकशी व्हायला हवी.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करजुवे – मुंबई सह सगळ्या एसटी फेऱ्या नियमित करा अशी मागणी होत आहे.त्यासोबतच माखजन बस् स्थानकाचे तात्काळ नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.












