भातावर “निळा भुंगेऱ्या”चा प्रादुर्भाव!

उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे शेतक-यांना आवाहन

गुहागर (प्रतिनिधी):यंदा पाऊस उशिरा व अनियमित झाल्यामुळे पेरणी व लावणी उशिरा झाली आहे. सद्यस्थितीमध्ये अधूनमधून पडणारा पाऊस, पिकाची जोमदार वाढ व पावसाची उघडीप यामुळे कीड व रोगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे पिवळा खोडकिडा, तपकिरी तुडतुडे, सुरळीतील अळी, पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे तर रोगांमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तर वेळंब परिसरात काही ठिकाणी भात शेतीवर निळे भुंगे-याचा प्रादुर्भाव आढळून आल्याचे कृषी अधिका-यांच्या पाहणीत दिसून आले. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी जागृत राहून भात शेतीचे नियमित सर्वेक्षण करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर व पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर.के.धायगुडे,कृषी विसतार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी केले आहे.

*वेळंब येथे भातावर “निळा भुंगेऱ्या”चा प्रादुर्भाव!*

*निळा भुंगेरा:* या किडीचा

प्रादुर्भाव भात पीक फुटव्याची अवस्था आणि पसवण्यापूर्वी होतो. पाणथळ जमीन आणि नत्र खताच्या अतिरिक्त वापराने या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून कृषी अधिकारी/कृषी विस्तार अधिकारी /कृषी सहाय्यक /यांच्या सल्ल्याने नियंत्रणाची उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सध्याच्या पावसात भात खाचरांमध्ये सतत पाणी राहिल्यामुळे काही ठिकाणी *निळा भुंगेऱ्याचा* प्रादुर्भाव दिसून येतो किंवा सुरू होऊ शकतो. *गुहागर तालुक्यातील वेळंब परिसरातदेखील* काही ठिकाणी या किडींचा प्रादुर्भाव दिसतो आहे.

*ओळखः*

भुंगेरे गर्द निळ्या रंगाचे असून, अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते.

प्रौढ भुंगा निमुळता, नळीसारखा लांबट व गर्द निळा असतो. शरीरावर हिरव्या रंगाची चमकणारी छटा असते.

नर भुंगा हा मादी भुंग्यापेक्षा मोठा असतो.

*जीवनक्रमः*

मादी भुंगेरे पानाच्या मागील बाजूस अंडी घालतात. त्या अंड्यांची लांबी 0.20 मि.मी., तर रुंदी 0.12 मि.मी. असते.

अंड्यांमधून 6 ते 7 दिवसांत छोट्या मातकट पांढरट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. त्या *पानांमधील हरितद्रव्य खरवडून* उपजीविका करतात. त्याच ठिकाणी 12 ते 15 दिवसांत कोषावस्थेत जातात.

कोष किंचित पांढरट तांबूस असतात. त्यामधून एका आठवड्याने *भुंगे* बाहेर पडतात.

*नुकसानः*

प्रौढ *भुंगेरे पानांच्या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य* खातात. अळ्या पान पोखरून आतील हरित भाग खातात. त्यामुळे पानांवर समांतर पांढऱ्या रेषा उमटतात. अनेक रेषा एकमेकांत मिसळतात. त्या ठिकाणी पांढरा चट्टा तयार होतो. _(काही शेतकरी याला करपा पडला असं म्हणतात; मात्र हा करपा रोग नसतो.)_

कालांतराने पानांवरील चट्टे तपकिरी होतात. पाने करपल्यासारखी दिसतात.

किडीचा प्रादुर्भाव पीक फुटव्याच्या अवस्थेत व पसवण्यापूर्वी होत असतो, तसेच पाणथळ जमीन आणि नत्र खताच्या अतिवापराने प्रादुर्भाव वाढतो.

*आर्थिक नुकसान पातळी*

पुनर्लागवडीच्या वेळेस – 1 भुंगेरा किंवा 1 प्रादुर्भित पान प्रति चूड.

फुटवाच्या अवस्थेत – 1 भुंगेरा किंवा 1 ते 2 प्रादुर्भित पाने प्रति चूड.

*नियंत्रणाचे उपायः*

ही कीड भात पिकानंतर बांधावरील गवतावर आणि भाताच्या फुटव्यांवर उपजीविका करते आणि पुढील हंगामात भात पिकास उपद्रव करते. त्यासाठी भात लागवडीनंतर बांध स्वच्छ ठेवावेत.

शेतात पाणी जास्त काळ न साठता निचरा होईल याची काळजी घ्यावी.

भात खाचराच्या आजूबाजूस असलेल्या *निळा भुंगेऱ्याच्या* इतर खाद्य वनस्पती उदा. धूर, कसई, चिमणचारा, रानटी नाचणी यांचे समूळ नियंत्रण करावे. त्यामुळे या किडीच्या प्रौढ भुंग्यांना खाद्य उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा पुढील प्रादुर्भाव रोखता येतो.

किडीच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्‍टरी *क्विनॉलफॉस* (25 टक्के प्रवाही) 25 मिली किंवा *लॅंबडा सायहॅलोथ्रिन* (5 टक्के प्रवाही) 6 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

असे आवाहन तालुका कृषी अधिकारी

व कृषी विभाग, पंचायत समिती च्या वतीने केले आहे.