खेड (प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून गणेशभक्तांचा प्रवास वेगवान झाला असला तरी सोयीसुविधांअभावी गैरसोयींचाच पाढा वाचला जात आहे. एकीकडे एकेरी मार्गाच्या सुविधेचा बोजवारा उडालेला असतानाच दुसरीकडे बोगद्यात मोबाईल रेंजसह वायुविजनाचा अभावच असल्याचे पुढे आले. आहे. काँक्रिटच्या पिचिंगवरून वाहनांवर पाण्याची गळतीही सुरू आहे. कोकणाकडे येणाऱ्या बोगद्याची लांबी मुंबईकडे जाणाऱ्या बोगद्याच्या तुलनेत कमीच असल्याने काँक्रिटच्या अर्ध वर्तुळाकार भुयाराची जोड देण्यात आल्याचे समोर आले आहे.
बहुचर्चित कशेडी बोगद्यातील वाहतूकगणेशोत्सवापूर्वी खुली होईल की नाही, या बाबत सांशकताच व्यक्त केली जात होती. मात्र, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोगद्याच्या कामाकडे विशेष लक्ष केंद्रीत करत गणेशोत्सवापूर्वी मुंबईहून गोव्याकडे जाणारी एक मार्गिका खुली करण्याचे निर्देश दिल्यानंतर कामाने वेग घेतला. ११ सप्टेंबरपासून बोगद्यातील वाहतूक हलक्या वजनाच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुली झाली आहे. अवघड वळणांच्या घाटातील ४५ मिनिटांचे अंतर बोगद्यातून अवघ्या ८ मिनिटांतच पार करणे शक्य झाले आहे. यामुळे ३७ मिनिटांच्या वेळेची बचतही होत आहे.
मुंबईहून गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांचा कशेडी बोगद्यातून सुस्साट झाला असला तरी गणेशभक्तांवर गैरसोयीचा पाढा वाचण्याची वेळ आली आहे. ३ पदरी भुयारी मार्गांपैकी एक पदरी काँक्रिटीकरण अपूर्णावस्थेत असल्याने ६ इंटर कनेक्टिव्हीटीच्या भुयारातून दुसऱ्या कोकणाकडे येणाऱ्या बोगद्याशी संलग्नताच झालेली नाही. कोकणात जाण्यासाठी ‘वनवे’ असलेल्या मुंबईकडील बोगद्याच्या डाव्या बाजूला काँक्रिटीकरणाचा एक पदरी अपूर्णच असल्याने वाहनांचा वेग ताशी ३० पेक्षा कमी ठेवावा लागत आहे.
या मंद वेगमयदिमुळे २ कि.मी. १०० मीटर लांबीच्या बोगद्यात दुपदरी काँक्रिटीकरणाच्या एकेरी रस्त्यावर गणरायाच्या आगमनापूर्वी २ दिवस अगोदर वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अपूर्णावस्थेत असलेल्या एका मार्गावरील खोल भागात उतरल्यास डाव्या बाजूच्या भुयाराच्या कातळावर आदळून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत कातळाला काँक्रिटीकरणाची पिचिंग देण्यासाठी स्टीलचे बार उभारण्यात आले आहेत. या बारमध्ये एखादे वाहन अपघातग्रस्त झाल्यास स्टीलच्या सळ्या वाहनांमध्ये घुसून जीवघेणी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बोगद्यातील छपरावरील कातळाला केलेल्या काँक्रिटच्या पिचिंगमधून पाण्याची गळतीच सुरू आहे. बोगद्यात वायुविजनचेही सुविधा नसल्याने दुचाकी व तीनचाकी वाहनांसह नॉनएसी वाहनातील प्रवाशांना गुदमरावे लागत असल्याचे अनेक वाहनचालकांचे म्हणणे आहे.
२ कि.मी. १०० मीटर लांबीच्या बोगद्यातून प्रवास करताना अपघात घडल्यास जोपर्यंत वाहने बोगद्याबाहेर येत नाहीत तोपर्यंत रेंजच मिळत नसल्याने अपघातप्रसंगी तातडीची मदत मिळण्यास विलंब होण्याचा धोका देखील कायम आहे.
तब्बल २०० मीटरने लांबी वाढवण्यासाठी आरसीसी स्ट्रक्चर उभारण्यात आले आहे.
कोकणाकडे येणाऱ्या बोगद्याच्या मार्गाचे खोदकाम पूर्ण झाले असले तरी बोगद्याची निर्धारित लांबी मुंबईकडे जाणाऱ्या भुयारी मागपिक्षा कमी आहे. यामुळे पोलादपूरच्या बाजूला दोन्ही भुयारी मार्ग एकाच समान रेषेत येण्यासाठी कोकणाकडे येणाऱ्या भुयाराच्या खोदकामापुढील भागात अर्धवर्तुळाकार काँक्रिटचे बांधकाम करून बोगद्याकडे जाण्यासाठी आधुनिक दर्जाचा पक्का रस्ता प्रस्तावित असतानाही दोन्ही भुयारापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील ३ पुलांच्या अपूर्णावस्थेतील कामांपैकी २ पुलांच्या कामास काही दिवसापूर्वी सुरूवात झाली आहे. यामुळे बोगद्यातील अंतर्गत कामे अपूर्णावस्थेत असताना एकेरी मार्गावरील वाहतूक खुली करून चाकरमान्यांना मधाचे बोट कशासाठी दाखवण्यात आले, अस प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.










