करंबेळे व बोले कुटुंबियांच्या पुढाकारातून कोट येथे गुरूकृपा वाचनलयाचे उद्घाटन

जागतिक चित्रकार महेश करंबेळे यांची संकल्पना

लांजा( प्रतिनिधी) पुस्तके ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्रोत आहे.वाचन ही एक सवय आहे जी आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवू शकते. वाचनामुळे आपल्याला ज्ञान आणि प्रेरणा मिळते. ते आपल्याला स्मार्ट बनवते. असे मत कोट येथे राजापूर लांजा तालुका नागरिक संघ,मुंबई चे अध्यक्ष सुभाष लाड यांनी व्यक्त केले.

कोट गावातील दिवाळे वाडीतील बोलये व करंबेळे कुटुंबियांनी एकत्रित येऊन पंचक्रोशतील विद्यार्थी व भावी पिढीला दिशा देण्यासाठी गुरूकृपा वाचनालय सुरु केले आहे. या वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई चे अध्यक्ष सुभाष लाड बोलत होते.याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लाड म्हणाले लांजा तालुक्यातील कोट गावला ऐतिहासिक महत्व असून रणरागिणी लक्ष्मीबाईचे सासर असलेल्या कोट गावात अश्मयुगीन व ऎतिहासिक कलेचा उत्तम नमूना असलेला कातळशिल्प समूह आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रकाशात आणून तज्ञांना येथे आणले.जागतिक दर्जाचे चित्रकार महेश करंबेळे यांच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या बोले व करंबेळे कुटुंबियांनी सुरु केलेल्या या गुरूकृपा वाचनालयात कोकणातील प्रत्येक लेखक-कविचे एक तरी पुस्तक संग्रही असावे जेणेकरून हे वाचनालय वैशिष्टयपूर्ण ठरेल अशी सूचना करित या वाचनसंस्कार करण्यास मदत करणाऱ्या या वाचनालयाची निर्मिती करणाऱ्या कोटवासीयांचे त्यांनी मोकळेपणाने कौतुक केले.

या वाचनालयामागची भूमिका विशद करताना आंतरराष्ट्रीय चित्रकार महेश करंबेळे यांनी कोट गावासह पंचक्रोशीतील मुलांना गुरुकृपा वाचनालय सर्वांगीण विकासासाठी सहाय्यभूत ठरेल असा विश्वास व्यक्त केला.याप्रसंगी लांजा तालुक्याच्या पर्यटना विकासासाठी प्रयत्नशील असलेले लोकमान्य वाचनालय लांजाचे संचालक विजय हटकर यांनी या वाचनालयाची निर्मिती करणाऱ्या दोन्ही कुटुंबियांचे कौतुक केले.

 

गुरूकृपा वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी कोटच्या सरपंच निशिगंधा नेवाळकर, उपसरपंच रवींद्र नारकर, लांजा येथील पर्यटन अभ्यासक विजय हटकर ,महेंद्र साळवी, मंगेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य राजू सुर्वे, श्रीमती भिसे,श्री कांबळे, माजी सरपंच आबा सुर्वे, राजु नेवाळकर, दिलीप मेस्त्री, प्रमोद मेस्त्री,महेश करंबेळे,दिवाळे वाडीप्रमुख, नारकर वाडीप्रमुख,तसेच गावातील भिसे, बोले, डिके, करंबेळे, भुवड ,रेवाळे, पांचाळ,सुर्वे,नारकर, विचारे कुटुंबातील मंडळी आदी मान्यवर उपस्थित होते.