वर्ल्डकपच्या उद्घाटनाच्या सामन्यात न्युझिलंडची विजयी सलामी

गतविजेत्या इंग्लंडचा धुव्वा : १३ षटकं राखत विजय
अहमदाबाद : आज पासून सुरू झालेल्या १३ व्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उद्घाटनाच्या सामन्यात न्युझीलंड संघाने गतविजेत्या इंग्लंडला चारी मुंड्या चीत करीत धुव्वा उडविला. इंग्लंडने ५० षटकांत दिलेले २८३ धावांचे लक्ष केवळ ३६ षटकांत पार करीत न्युझीलंडने नऊ गडी राखून हा विजय प्राप्त केला. न्यूझीलंडच्या कॉनवे नाबाद १५२ ( १२१) व रचिन रविंद्र नाबाद १२३ ( ९६) यांनी तुफानी खेळी करीत इंग्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेत विजयश्री खेचून आणली.
गुजरात मधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तेराव्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना आज खेळविण्यात आला. गत विजेत्या इंग्लंड व उपविजेता न्यूझीलंड या दोन संघादरम्यान हा सामना झाला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला. त्यानंतर सुरुवातीला आक्रमक खेळी करणाऱ्या इंग्लंडला त्यांनी ५० षटकात केवळ २८२/९ धावांवर रोखले. इंग्लंड कडून जो रूट याने वैयक्तिक ७७ धावांचे योगदान दिले. तर न्युझीलंड संघातर्फे मॅट हेन्रीने ३, सॅटनर व ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग शुन्यावर माघारी फिरला. मात्र, त्यानंतर कॉनवेच्या साथीला आलेल्या रचिन रविंद्रने चांगली साथ दिली. त्यानंतर कॉनवे व रचिन रविंद्र या दोन्ही फलंदाजांनी शतकी खेळी करीत केवळ १ गडी बाद २८३ धावा करीत इंग्लंडला पराभूत करीत गत विश्वकपच्या अंतिम सामन्याचा बदला घेतला.
उद्या शुक्रवारी पाकिस्तान व नेदरलँड या दोन संघादरम्यान हैद्राबाद येथे सामना खेळविला जाणार आहे. तर भारताचा पहिला सामना रविवारी ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरोधात होणार आहे. तर १४ रोजी अहमदाबाद येथेच पाकिस्तान सोबत भारताचा हाय व्होल्टेज सामना खेळविला जाणार आहे.