रोणापाल येथे सौ. स्नेहल गावडे ठरल्या पैठणीच्या विजेत्या

बांदा : प्रविण परब :   रोणापाल येथील श्री देवी माऊली सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात सौ. स्नेहल विनोद गावडे प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. सौ. दीक्षा दीपक परब द्वितीय तर सौ. अनादी अजय गावडे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. देवस्थान समिती अध्यक्ष प्रकाश गावडे व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक पैठणी व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
रोणापाल माऊली मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त ‘खेळ पैठणीचा, जागर माऊली मातेचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धात्मक कार्यक्रमात गावातील ४० महिलांनी सहभाग घेतला. विविध फेर्‍यांमधून स्पर्धक महिलांची समयसूचकता, सामान्य ज्ञान, निर्णयक्षमता याची चाचपणी करण्यात आली. सर्वाधिक गुण मिळवून सौ. स्नेहल गावडे पैठणीच्या विजेत्या ठरल्या.
यावेळी व्यासपीठावर उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे, उपसरपंच कृष्णा गावडे, ग्रा. पं. सदस्य नंदकिशोर नेमण, सौ. निकिता शेगडे, सौ. उज्वला गावडे, सौ. उज्वला देऊलकर, मंडळाचे सचिव विष्णू सावंत, खजिनदार बाबल तुयेकर, सहसचिव मंगेश गावडे, सुदीन गावडे, कोकण रेल्वे कर्मचारी तानाजी गावडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी कार्यक्रमाला भेट देऊन श्री माऊलीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत पुंडलीक दळवी, विवेक गवस उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन कळंगुटकर यांनी केले. सुत्रसंचलन दयासागर छात्रालयाचे व्यवस्थापक जीवबा वीर यांनी केले. कार्यक्रमाला गावासह पंचक्रोशीतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.