अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरीची कारवाई
रत्नागिरी | प्रतिनिधी : हॉटेल बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील नाहरकत दाखला देण्यासाठी हॉटेल मालकाकडून १५ हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यकाला रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. भ्रष्ट्राचार निर्मुलन जनजागृती सप्ताहामधेच एका लाचखोराला पकडण्यात यश आले आहे.
याबाबत उपलब्ध माहितीनुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार त्यांना हॉटेल बांधण्यासाठी आरोग्य विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक होता. यासाठी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, कोतवडेचे आरोग्य सहाय्यक शैलेश आत्माराम रेवाळे (वय- ३८) यांना संपर्क केला होता. या आरोग्य विभागाकडील नाहरकत दाखला देण्यासाठी यातील आरोपी शैलेश रेवाळे याने हॉटेल व्यावसायिकाकडे २६ ऑक्टोबर रोजी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. ती रक्कम मंगळवारी 31 ऑक्टोबररोजी देण्याचे ठरले होते.
याचवेळी हॉटेल व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचला आणि रत्नागिरी शहरातील एका हॉटेलमध्ये १५ हजार रुपये प्रत्यक्ष घेताना आरोग्य सहाय्यक शैलेश आत्माराम रेवाळे हा रंगेहात पकडला गेला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला यांच्या नेतृत्वात पोहवा. संतोष कोळेकर, पोहवा.विशाल नलावडे, पो. ना. दिपक आंबेकर, पो.कॉ. हेमंत पवार यांच्या पाठकाने यशस्वी केली.









