सावंतवाडी । प्रतिनिधी : कुणकेरी येथे मोटरसायकल रॅली काढून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शांततेच्या मार्गाने एक दिवस लाक्षणिक उपोषण केले. कुणकेरी गावातील मराठा समाज बांधवांनी मोटरसायकल रॅली काढून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला. तसेच ग्रामपंचायती समोर एक दिवस लाक्षणिक उपोषण केले. यावेळी मराठा समाज तालुका अध्यक्ष सिताराम गावडे व पुंडलिक दळवी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
यावेळी प्रमोद सावंत, मंगेश सावंत, मनोज घाटकर, पांडुरंग सावंत, एकनाथ सावंत, सुनील परब, शिवाजी सावंत, बाळकृष्ण सावंत,मधुमती गावडे, गणपत सावंत,मनाली परब,विश्राम सावंत,भूषण सावंत,राजन पडवळ,जयेश सावंत, सुरेश सावंत यांच्यासह मोठ्या प्रमाणात समाज बांधवांन एकत्रित आले होते.
यावेळी मराठा समाज तालुका अध्यक्ष सिताराम गावडे म्हणाले, समाज बांधवांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने लढा दिला पाहिजे. जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन बांधवांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून बळ देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
मनोज घाटकर म्हणाले, बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहेत. पण सध्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना एकत्र करून दिशा दिली पाहिजे.
गावडे म्हणाले, मराठा समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे आरक्षण मिळालेच पाहिजे. सर्व क्षेत्रात पात्रता असूनही मागे राहावे लागते त्यामुळे आरक्षण मिळावे पाहिजे.
पुंडलिक दळवी म्हणाले, राज्यभरातील मराठा समाज बांधवांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते समोर आले असल्याने आपणही मराठ्यांच्या आरक्षणावर शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडले पाहिजे. शैक्षणिक, उद्योग अशा प्रत्येक पातळीवर समाजाला पात्रता असूनही डावलले जात आहे त्यामुळे हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे. यावेळी प्रमोद सावंत, मंगेश सावंत यांनी मराठा समाजाला एकत्र येऊन एकजूट दाखवून देण्याची ही वेळ आली आहे असे आवाहन केले.











