सोनुर्ली ‘बाये’च्या चरणी भक्तीचे लोटांगण

हजारो भाविक भक्तांनी केली नवसफेड

तुलाभाराने दोन दिवसांच्या जत्रोत्सवाची सांगता

सावंतवाडी । प्रतिनिधी : सोनुर्ली माऊलीच्या जत्रौत्सवानिमित्त मंगळवारी रात्री हजारो भाविकांनी माऊली चरणी लोटांगण घालून आपला नवसफेड केला. हा नयनरम्य सोहळा ‘याची देही याची डोळा ‘ पाहण्यासाठी भाविक त्याच उत्साहाने मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांची श्रद्धा व माऊलीच्या कृपेने निर्विघ्नपणे जत्रौत्सव संपन्न झाला. त्यानंतर बुधवारी सकाळी तुलाभारानंतर जत्रोत्सवाची सांगता करण्यात आली.

दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या सोनुर्ली श्री देवी माऊलीच्या दोन दिवस चालणाऱ्या जत्रोत्सवाला यावर्षीही भक्तांची अलोट गर्दी झाली होती. दरवर्षीप्रमाणेच भाविकांचा जनसागर देवीच्या दर्शनाला लोटला होता. एसटी महामंडळाच्या गाड्यां सोबतच खाजगी वाहनाने देखील भाविक सोनुर्लीत दाखल होत होते. आपल्या माय माऊलीच्या भेटीसाठी भक्तगणांनी अलोट गर्दी केली होती. दिवसभर ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे व फेडणे आदी कार्यक्रम सुरू होते.

त्यानंतर रात्रौ अकरानंतर देवी माऊलीचा कौल घेऊन मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून लोटांगणाला सुरूवात झाली व मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करीत त्याच पायरीपर्यंत येऊन पूर्ण केली. तत्पूर्वी मांडावरून घंटा व वाद्यांच्या गजरात उत्सवमूर्ती पालखीतून आणली गेली. यावेळी फटाक्यांची नयनरम्य आतषबाजीही करण्यात येत होती.
पालखी मंदिराकडे पोहोचताच लोटांगणाला सुरूवात झाली. यात हजारो भाविकांनी आपला लोटांगणाचा नवस फेडला. यात महिला भाविकांची संख्याही लक्षणीय होती. देवस्थान कमिटीकडून चोख व्यवस्था करित लोटांगणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीदेवी माऊलीच्या अवसारांनी तरंगकाठीसह भक्तांना दर्शन दिले. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
पुरुष भाविकांची लोटांगणे पार पडताच महिलांची लोटांगणे झाली. जवळपास चार हजाराहून जास्त महिला व पुरुष भाविकांनी बाये चरणी लोटांगण अर्पण केले. रात्री उशिरा स्थानिक दशावतार नाट्य मंडळाचे पौराणिक दशावतारी नाटक सादर करण्यात आले.

बुधवारी सकाळी गावातील गावकरी मंडळी व केळीकुळ आदींनी देवीच्या दर्शनासाठी व केळी नारळ ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर तुलाभार कार्यक्रम पार पडला. यावेळी तुला भराचा नवस बोललेल्या भाविकांनी आपली नवसफेड केली. तांदूळ गूळ साखर अन्नधान्य व इतर वस्तूंनी यावेळी तुलाभार करण्यात आला.
अखेर देवीच्या कौलाने जत्रौत्सवाची सांगता झाली.