जिल्हा रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणूनच मी आलोय! मतभेद नकोत….. पालकमंत्री रवींद्र चव्हाण

माजी खासदार निलेश राणे यांची ही उपस्थिती!

सिंधुनगरी | बाळ खडपकर : जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवा बाबत तक्रारी आहेत म्हणून मी आलो आहे! मी लोकांसाठी आलोय, जिल्ह्यातील रुग्णांना चांगल्यात चांगली आरोग्य सेवा मिळायला हवी यासाठी माझी तळमळ आहे! त्यामुळे या प्रश्नाबाबत चुकीची माहिती देऊ नका. आपण माझ्याशी बोलता आहात हे लक्षात ठेवा! असा इशारा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता रामानंद यांना बुधवारी आढावा बैठकीत दिला. जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, माजी खासदार निलेश राणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदींच्या उपस्थितीत हे बैठक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी झाली.

गेले अनेक महिने सिंधू नगरी येथील जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बाबत रुग्णांच्या व लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी होत्या. जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात समन्वय नसल्यामुळे त्याचा फटका सर्व सामान्य गोरगरीब रुग्णांना बसतो याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. वृत्तपत्रातही याबाबत अनेक बातम्या आल्या होत्या. याबाबतची गंभीर दखल घेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे खास बैठक बोलावली होती.

जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवेसाठी अनेक रुग्ण दाखल होतात, मात्र त्यांना रुग्णसेवा देताना वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक रुग्ण शस्त्रक्रिये साठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी ताटकळत राहतात, काही इमर्जन्सी रुग्णांनाही औषध भंडारात औषधे उपलब्ध असतानाही मिळत नाहीत, त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक खाजगी मेडिकल शॉप मध्ये भटकत असतात, याबाबत अनेक तक्रारी होत्या, व त्यामुळे बुधवारी झालेल्या या बैठकीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबतचा सर्वच आढावा घेतला. जिल्हा रुग्णालय असो किंवा शासकीय महाविद्यालय असो यासाठी मनुष्यबळ कमी पडत असेल कंत्राटी पद्धतीने भरती करा त्यासाठी निधी कमी पडणार नाही, नाविन्यपूर्ण योजना यासाठी राबवा या जिल्ह्याचा आदर्श राज्यात जाईल असे काम या जिल्ह्यात करावे असे मला अपेक्षित आहे अशी आदेश वजा तंबी ही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेबाबत दैनिकांमध्ये येत असलेल्या बातम्या मी वाचल्या आहेत. त्यात तुमच्यात समन्वय नाही त्या अनुषंगाने ही आढावा बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याशी बोलता एवढं लक्षात ठेवा, मी लोकांसाठी बोलतोय असा सूचक इशारा देत रुग्णांच्या वाढत्या तक्रारी बाबत रिक्त पदांचा प्रश्न आपण जिल्हास्तरावर नावीन्य पूर्ण योजनेतून कंत्राटी भरती करू आणि महाराष्ट्रासमोर नवा आदर्श घालून देऊ यासाठी निधी कमी पडणार नाही, चुकीची माहिती देऊ नका, जे होणार नाही ते मांडण्यापेक्षा जे होणार आहे तेच मला सांगा, असा इशारा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिष्ठाता डॉक्टर सुनिता रामानंद यांना देत. जिल्हाधिकारी आपण आरोग्य यंत्रणेबाबत जबाबदारी घ्या अशा सूचना केल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्याच्या वाढत्या समस्या आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या वाढत्या तक्रारी पाहता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे अधिष्ठाता यांच्या सभागृहात आढावा बैठक घेतली यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, माजी खासदार निलेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, भाई सावंत, जिल्हा शैलचिकित्सक श्रीपाद पाटील, डॉ श्याम पाटील, आदींसह वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेबाबत कोणतीही तक्रार खपवून घेतली जाणार नाही. वृत्तपत्रांमध्ये वारंवार आरोग्याबाबत येणाऱ्या बातम्या पाहता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरा अशा सूचना देत तुमच्यातील असलेले अंतर्गत वाद मिटवा अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देत, औषध तुटवडा आहे का असा सवाल उपस्थित करत औषध तुटवड्या बाबत मला प्रत्येक आठवड्याला आढावा द्या. जिल्हाधिकारी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाबाबत जबाबदारी घ्या, अशा सूचना दिल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुनिता रामानंद यांनी आपल्या कार्यकाळातील शासकीय महाविद्यालय वैद्यकीय सिंधुदुर्ग येथील रुग्ण सेवा देण्यात आलेल्या सेवेचा आलेखाद्वारे सादरीकरण केलं यावेळी टक्केवारी न सांगता मला आकडेवारी द्या अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी करताच मागील दोन वर्षात चक्क 19 रुग्ण या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाल्याचे समोर आले. तर यामध्ये प्रत्यक्ष जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्ण संख्या तिपटीने वाढवून दाखवल्या असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सांगत जिल्हा रुग्णालयात औषध पुरवठा कमी आहे, त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषध विकत घ्यावी लागत आहेत याबाबत पालकमंत्र्यांसमोर खंत व्यक्त केली.

तर तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव पत्त्यासह यादी तयार करा ते कुठे जेवतात त्यांना येणारा खर्च याबाबत मला येत्या सात दिवसात आढावा द्या मला ही माहिती पोलीस प्रशासनास द्यायची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तर रुग्णालयात सुसज्ज पॅथॉलॉजी असून त्या ठिकाणी तज्ञ उपलब्ध होऊ शकत नाही तर तातडीने कंत्राटी पद्धतीवर भरती करा, अशी भरती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत सुरू करा निधी कमी पडू देणार नाही असेही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीदरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण व अधिष्ठाता डॉ.सुनीता रामानंद यांच्यात माहिती देण्यावरून शाब्दिक चकमक उडाल्याची पाहायला मिळाले. तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काय होणार नाही याची माहिती देण्यामध्ये अग्रेसर आहात जे येथे घडू शकतं जे उभे राहू शकते याबाबत माहिती द्या असा सल्लाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिष्ठाता डॉ.सुनिता रामानंद यांना दिला.