बांदा (प्रतिनिधी) : कोकण कला व शिक्षण विकास संस्था महिला सक्षमीकरण या विषयावर गेले अनेक वर्षे काम करत आहे. महिला सबळ झाल्यास कुटुंब सक्षम होऊ शकते या उद्देशाने महाराष्ट्रात काम करत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या तालुक्यात आतापर्यंत संस्थेने शेकडो महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले असून त्यातील २० गरजू महिला आयएसएस कंपनीच्या माध्यमातून शिलाई स्कूल प्रकल्पांतर्गत ३ महिने टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंगचे उच्च दर्जाचे ट्रेनिंग, व्यक्तीमत्व विकास, खरेदी विक्री कौशल्य, आर्थिक साक्षरता, स्वयंरोजगार आणि व्यवसाय वृद्धी असे अनेक कौशल्य देऊन त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन व किट उपलब्ध करून देण्यात आले.
महिला बचतगट सभागृह, आनगाव येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. प्रत्येक महिलेला शिलाई मशीन मशीन, किट व सर्टिफिकेटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयएसएस कंपनीचे व्यवस्थापक प्रतीक पाटील, नौशाद शेख, कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक रामचंद्र पाटील, प्रीती पांगे, कार्यकर्ते सलिना बुटेलो, अभिजित रेडकर, इमेनूअल दास, नाव्या पाटील, शिक्षिका सौ. वैशाली प्रसन्नदर्शी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोकण संस्थेच्या या उपक्रमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून आम्ही सर्व महिला संस्थेचे आणि कंपनीचे आभार मानतो अशा शब्दात सौ. प्रांजली गायकर यांनी संस्थेच्या कामाची स्तुती केली.आयएसएस कंपनी आणि कोकण संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या मशीनमधून आम्ही आमच्या कुटुंबियांसाठी उदरनिर्वाह उपलब्ध करूच. शिवाय आर्थिक सक्षम बनून कुटुंब आणि समाजात नाव कमवू असे लाभार्थी समीक्षा तानपुरे यांनी यावेळी सर्वांच्या वतीने आश्वासित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत सातपुते व आभार प्रदर्शन प्रीती पांगे यांनी केले.










