भडगाव-खोंडेत धावू लागली ‘घंटागाडी’

खेड | प्रतिनिधी : भडगाव-खोंडे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेचा करार संपल्याने कचरा वाहतुकीसाठी लाखो रूपयांची खरेदी केलेली घंटागाडी ग्रामपंचायतीच्या आवारात गेली ९ महिने उभी होती. करार संपलेल्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. यासाठी १२ डिसेंबरपासून घंटागाडी धावू लागली आहे.

भडगाव – खोंडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत भडगाव- उसरेवाडी, नक्षेवाडी, शेवरवाडी तर खोंडे – जोगळेवाडी, मधलीवाडी. कातळवाडी, नवानगर आदी वाड्यांसह शाळा, महाविद्यालयांबरोबरच टोलेजंग इमारतींदेखील उभ्या राहत आहेत. वाढत्या लोकवस्तींमुळे कचराप्रश्न जटील बनल्याने गतवर्षी कचरा विल्हेवाटीसाठी भाडेतत्त्वावर जागा घेतली होती. कचरा वाहतुकीसाठी १५व्या वित्त आयोगातून ७ लाखांची घंटागाडी देखील खरेदी केली होती. मात्र, एप्रिलमध्ये जागेचा करार संपल्याने कचरा विल्हेवाटीचा प्रश्न उभा टाकल्याने घंटागाडी ग्रामपंचायतीच्या आवारात उभी होती. कचरा विल्हेवाटीसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने कचऱ्याचे ढीग होवून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ग्रामपंचायतीने करार संपलेल्या जागेत संबंधित मालकाच्या परवानगीने तात्पुरत्या स्वरूपात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे .