नाशिकच्या प्रकाश वाणी यांना ४२ वर्षानंतरही ‘आहार’ च्या चवीची ओढ !

रत्नागिरी : मनुष्य जगण्यासाठी व्यापार व्यवसाय करत असतो, नोकरी धंदा करत असतो. यावेळी निर्माण झालेले ऋणानुबंध कायमचे जपले जातात. अशा ऋणानुबंधांना कधी नात्यागोत्यांची किंवा व्यापार व्यवसायाची चौकटी नसते. असाच एक अनुभव रत्नागिरी शहरातील आहार रेस्टॉरंटचे मालक अभय जोग यांना आला. 1978 साली रत्नागिरीतील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकायला असणारे प्रकाश वाणी हे तब्बल 40 -42 वर्षानंतर नाशिकहून रत्नागिरीला आले असता त्यांनी आवर्जून आहार रेस्टॉरंटला त्यांनी भेट दिली आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

रत्नागिरी शहरातील माळनाका येथील आहार रेस्टॉरंट गेली 62 वर्ष अखंडपणे रत्नागिरीकरांची, नोकरदार, विद्यार्थी, एसटी कर्मचारी यांची चव जपत आले आहे. श्रीराम उर्फ बाळूअप्पा विठ्ठल जोग हे 1960 च्या दरम्यान व्यवसायानिमित्त रत्नागिरीमध्ये आले. याच काळात रत्नागिरी शहरातील माळनाका परिसर हा हळूहळू विकसित होत होता. एसटी डेपो, डीएड कॉलेज आणि पॉलीटेक्निक नव्याने सुरू होत होतं. रत्नागिरीत बाहेरून येणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत होती. अशावेळी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि नोकरदारांच्या समोर जेवण आणि नाश्त्याचा प्रश्न नेहमीच उभा राहत असे. ही गरज ओळखून बाळूआप्पा जोग यांनी 4 एप्रिल 1962 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘आहार’ रेस्टॉरंट सुरू केलं. आज जोग कुटुंबियांची तिसरी पिढी हा व्यवसाय चालवते. वेगवेगळ्या गावाहून, शहरातून, जिल्ह्यातून रत्नागिरीत आलेल्या हजारो, लाखो लोकांनी ‘आहार’ची चव चाखली आहे आणि ती कायम स्मरणात ठेवली आहे. असाच अनुभव आज आहार रेस्टॉरंटचे मालक अभय जोग यांना आला.

1978 साली रत्नागिरीतील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकायला असणारे प्रकाश वाणी हे आज अचानक आहार रेस्टॉरंटमध्ये आले आणि त्यांनी आपली ओळख श्री. जोग यांना करून दिली. त्यांच्या समवेत त्यांची पत्नी आणि परिवार सुद्धा होता. ते पॉलिटेक्निकचे विद्यार्थी असताना रोज जेवणासाठी आहार रेस्टॉरंटमध्ये यायचे. ते रेस्टॉरंटचे मासिक मेंबर होते. ‘आहार’ मध्ये त्यावेळचं संपूर्ण महिन्याचं जेवण फक्त 80 रुपयाला मिळायचं असं प्रकाश वाणी यांनी आवर्जून सांगितलं.

प्रकाश वाणी हे नाशिकला असतात. ते एमएसईबीमधून आता निवृत्त झाले आहेत आणि त्यांनी खूप वर्षांनी ‘आहार’ला ‘ आवर्जून भेट दिली आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.