चिपळूण (प्रतिनिधी) : दरवर्षी डिसेंबर महिना सुरू झाला की चिपळूण मधील कीर्तन रसिकांमध्ये एक चर्चा सुरू होते. कीर्तनमाला केव्हा आहे? याचे कारणही तसेच आहे. गेली आठ वर्षे चिपळूणमधील श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे विद्यावाचस्पती राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त बुवा आफळे यांची विविध विषयांवरील कीर्तनमाला खुल्या प्रांगणात भव्य आयोजनाने संपन्न होत आहे. दशावताराने सुरू झालेल्या या कीर्तनमालेत आजपर्यंत राजपुतांचा इतिहास, आर्य चाणक्य, छत्रपती श्री शिवराय, छत्रपती श्री शंभुराजांची शौर्यगाथा अशा विविध विषयांचा वेध आफळेबुवांनी आपल्या व्यासंगी, अभ्यासू विवेचनातून आतापर्यंतच्या कीर्तनमालेत घेतला आहे.
इतिहासाचा विचार केला तर हिंदुस्थानाला यवनी सत्ता, ब्रिटिश सत्ता यांनी पूर्णपणे खिळखिळी करून टाकलेली. या सर्व सत्तांशी छत्रपती श्री शिवराय, छत्रपती संभाजीराजेंना तोंड द्यावे लागले. या सर्व इतिहासाची माहिती वेगवेगळ्या पुस्तकांतून अभ्यासकांनी मांडली आहे, पण आज हे सर्व वाचन यंत्र युगाच्या अधीन झालेल्या नव्या पिढीला पुरेसे ठाऊक नाही पण समजून घेण्याची जिज्ञासा आहे. अशा सर्व श्रोत्यांसाठी ही कीर्तनमाला पर्वणी ठरते आहे. केवळ मठ मंदिरामधून बंदिस्त असलेल्या किर्तनाला राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. आफळेबुवां व आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराने खुल्या प्रांगणात आयोजित करताना दोन ते तीन हजार रसिकांच्या उपस्थितीतील भव्यतेने देऊळ- मठात मोजक्या कीर्तन रसिकांचे उपस्थितीत होणाऱ्या कीर्तनाला आज नवं कोंदण लाभले आहे. यामुळे गेली आठ वर्षे चिपळूण येथील कै. खेडेकर क्रीडा संकुल येथे श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे आयोजित होत असलेली भव्य कीर्तनमाला रसिकांसाठी दरवर्षी स्मरणीय ठरते आहे.
उत्कृष्ट वक्तृत्व, उत्तम गायन, विनोद, कोपरखळ्या आणि त्याचबरोबर गाढा अभ्यास या सर्व गुणांमुळे आफळेबुवांची कीर्तने रसिकांना नेहमीच प्रभावी करतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी कीर्तनमालेत श्रीयुत गंगाधर देव (हार्मोनियम) मिलिंद तायवाडे (तबला) मनोज भांडवलकर (पखवाज) प्रमोद जांभेकर (व्हायोलिन) आणि चिपळूणचा सहगायक म्हणून वरद केळकर, पखवाजवादक श्री. नवरत यांनी दिलेली उत्तम साथ रसिकांची दाद लाभणारी होती . यावर्षीच्या कीर्तनमालेत पूर्व रंगासाठी ‘रामगावा राम घ्यावा’ हा अभंग बुवानी घेतला होता. येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येला होत असलेल्या श्रीराम मंदिर व प्राणप्रतिष्ठा या पार्श्वभूमीवर रामायणातील काही प्रसंगात अयोध्येचं गदिमा यांनी केलेले वर्णन बुवांनी विशद करताना प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनातील प्रसंग आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनातील प्रसंग यांचा तौलनिक आलेख बुवांनी मांडला , छत्रपती शंभुराजेंच्या चरित्रावर घेतले जाणारे आक्षेप याचा परामर्श घेतला. वयाच्या आठव्या वर्षी आग्र्याला जाणे, मथुरेला जाणे , छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या गादीचे दुसरे छत्रपती होताना १६८० ते १६८९ या काळातील अनेक युद्ध प्रसंग सांगताना बुवांच्या नेहमीच्या अभिनय शैलीतील सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध होतात. शेवटी संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्यावर औरंगजेबाने त्यांचे हाल हाल करून त्यांना मारले हा प्रसंग वर्णन करताना आवेश आणि अभिनय यामुळे बुवांचे कीर्तन रसिकांच्या मनाचा ठाव घेते.
धर्मासाठी जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि धर्मासाठी मरावे कसे हे शंभूराजांनी दाखवून दिले असे शौर्यगाथा छत्रपती शंभूराजांची कीर्तन पुष्पाची सांगता करताना, रसिकांना सांगताना आफळेबुवा भावुक करतात. यावेळी आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराकडून व्यासपीठाचे पडद्यावर अधोरेखित केलेली पुढील काव्यपंक्ती या चरित्रासाठी सार्थ ठरविते… देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था | महापराक्रमी परम प्रतापी एक हि शंभुराजा था || ही पंक्ती या चरित्राने सार्थ ठरते. यंदाची कीर्तनमाला सुरू असताना सांगता दिवशी आलेल्या अवकाळी पावसामुळे आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराची खूपच धावपळ झाली. एक प्रकारे स्वामीनी आयोजकांची परीक्षाच पाहिली. पण सारे कार्यकर्ते स्वामींचे निस्सिम भक्त ह्या परीक्षेला उतरले! सांगतेसाठी स्थळ बदलाबाबत अल्प अवधी असताना आयोजक परिवाराने तत्परतेने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात रसिकांच्यासाठी केलेलं नेटकं नियोजन याचं कौतुक करावं तितकं थोडं ! असं म्हणावं लागेल .आफळेबुवा यांनी सांगता पुष्पाचे प्रारंभीच आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराचे याबद्दल कौतुक करताना अल्पावधीत झालेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील “नेटके नियोजन” याचा उल्लेख केला. आयत्यावेळी अडचण आली तर पुर्वतयारी म्हणून टीमवकॆ असं असावं अशा शब्दात बुवांनी आयोजक परिवाराचे कौतुक केले. या कौतुकाबददल इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अपुरे पडलेल्या “हाऊसफुल्ल” गर्दीतील रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दिलेली दाद निश्चितच यथोचित होती.
चिपळूणमधील संत साहित्याचे अभ्यासक आणि प्रवचनकार धनंजय चितळे यांनी श्री स्वामी चैतन्य परिवाराचे कौतुक करताना दिलेली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे …. सदा सर्वदा देव संनिध आहे! कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे || या समर्थ रामदास स्वामींच्या वचनाप्रमाणे आजचा कार्यक्रम झाला. थोडीशी परीक्षा बघताना श्री स्वामी समर्थांनी ते नेटकेपणाने करून घेतले त्यामुळे पुढील गोष्टी झाल्या…. आपले श्रोते आपल्याला किती आणि कसं सहकार्य करतात हे दिसले. आयत्यावेळी कार्यक्रम करणारे टीमवर्क तयार आहे हे सिद्ध झाले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र पुन्हा सुरू झाल्यावर हा पहिलाच धार्मिक कार्यक्रम. ज्यानी आपल्या कारकिर्दीत छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका रंगवली त्यांच्या घरासमोर या चरित्राचा भाग मांडला गेला. श्री स्वामी चैतन्य परिवाराने घेतलेल्या कष्टाबद्दल सर्वांचे मनापासून कौतुक आणि सर्वांना नमस्कार ! असं धनंजय चितळे यांनी आपल्या अभिप्रायात म्हटलं आहे. चिपळूण येथील रसिक श्रोत्यांमधील सौ. सई दामले यांनी देखील ही मालिका संपूच नये असे त्यांच्या प्रतिक्रियेत नमूद केले आहे. नैसर्गिक आपत्तीवर मात करून ही मालिका यशस्वी केल्याबद्दल परिवारातील सर्वांचे कौतुक केले आहे.
या कार्यक्रमाला खेंड – चिपळूण येथील रहिवासी असलेल्या डॉक्टर जोशी यांनी देखील आयोजक परिवाराला अभिप्राय पाठविताना मी व माझा नातू या मालिकेला उपस्थित होतो. कार्यक्रम उत्तम उद्बोधक आणि प्रेरणादायी होता असे म्हटले आहे . एकंदरीत श्री स्वामी समर्थ भक्त कै. वासुदेवकाका दळवी यांनी दिलेल्या प्रेरणेतून श्री स्वामी चैतन्य परिवाराने भव्य कीर्तनमालेचा हाती घेतलेला उपक्रम या तयारीसाठी परिवारातील कार्यकर्त्यांकडून घेतले जाणारे अथक परिश्रम व या परिश्रमाला असलेला सद्गुरूंचा आशीर्वाद यामुळे श्री स्वामी चैतन्य परिवाराची भव्य कीर्तनमाला रसिकांसाठी दरवर्षी संस्मरणीय ठरते आहे!! सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून श्री स्वामींच्या कृपेने चाललेल्या या कार्याचा वेलू आज गगनावरी जातोय हे निश्चित !! आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराचे याबाबतीत मनस्वी कौतुक आणि पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छाही.












