अमंळनेरच्या ९७व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या मान्यवर कवी संमेलनासाठी रत्नागिरीतील अमृता विजय नरसाळे यांना निमंत्रण

चिपळूण :: अंमळनेर (जळगाव) येथे मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने २ ते ४ फेब्रुवारी रोजी संपन्न होत असलेल्या ९७व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या कवी संमेलनात रत्नागिरी येथील कवयित्री श्रीमती अमृता विजय नरसाळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अमृता नरसाळे यांचा ‘काही स्वप्नांचं असंच असतं’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. पारिजात या प्रायोगिक चित्रपटाचे गीत लेखन त्यांनी केले आहे. आकाशवाणी मुंबई व रत्नागिरी केंद्रावर त्यांच्या कवितांचे प्रसारण झाले आहे.

 

कोकण विभागातून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रतिनिधीपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांची निवड झाल्यानंतर कोकण विभागातून अनेक कवी आणि वक्ते यांना अ. भा. साहित्य संमेलनात प्रतिनिधित्व करता आले आहे. यावर्षी कोकणातील पूज्य सानेगुरुजींच्या कर्मभूमीत, अमळनेर येथे संपन्न होत असलेल्या संमेलनात अमृता नरसाळे सहभागी होत आहेत. त्यांच्या निवडीने कोकणातील साहित्यिक परिवारात आनंद व्यक्त होत आहे.