कुडाळ येथे १३ व १४ जानेवारीला “स्नेहबंध” चे आयोजन

कुडाळ : कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने १३ व १४ जानेवारीला कुडाळ येथे “स्नेहबंध” या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळदेशकर ज्ञाती बांधवांसाठी मर्यादित क्रिकेट सामने हे लीग पद्धतीने कुडाळ एमआयडीसी येथे फायर ब्रिगेड समोरील मैदानावर खेळवली जाणार आहे. या स्पर्धांचे उद्घाटन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शेखर उर्फ पप्पू नाईक आणि सावंतवाडी येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. शंतनू तेंडुलकर यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे.

या क्रीडास्पर्धेमध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यातील खेळाडूंचा समावेश असणार आहे. यावर्षीपासून या स्पर्धा लीग पद्धतीने
खेळवल्या जाणार असून विजेत्या आणि उपविजेत्या संघांना स्नेहबंध क्रीडा चषक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच १४
जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक संकुलामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन परुळे येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर उमाकांत सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञातीबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित देसाई, सचिव प्रशांत धोंड आणि कार्यकारीणीने केले आहे.