आचरा बायपासच्या संपादन झालेल्या रस्त्याचे काम सुरु करण्यात यावे..

आशिये सरपंच महेश गुरव यांची आ.नितेश राणे यांच्याकडे मागणी ; मार्चनंतर काम सुरु होणार

कणकवली :कणकवली आचरा मार्गावर आप्पासाहेब पटवर्धन चौक ते कलमठ बाजारपेठपर्यंत सातत्याने होणा-या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून आचरा बायपास रस्त्याच्या निर्मितीचा निर्णय झाला. या रस्त्यासाठीची प्रक्रिया सुरु होऊन सुमारे १२ ते १३ वर्ष उलटली. मात्र अदयाप रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. वरवडे फणसनगर ते कलमठ, आशिये या गांवातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

 

ही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन काही वर्षे उलटली तरीही प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरु झालेले नाही,तरी तातडीने हा रस्ता करण्यात यावा,अशी मागणी आ.नितेश राणे यांच्याकडे आशिये सरपंच महेश गुरव यांनी केली.त्यावर आ.नितेश राणे यांनी आगामी बजेटमध्ये सदर कामाचा समावेश करावा,अशा सूचना कार्यकारी अभियंता अजयकुमार सार्वगोड यांना दिल्या आहेत.त्यामुळे मार्चनंतर या रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे आशिये सरपंच महेश गुरव यांनी सांगितले.