रत्नागिरी : देशाच्या सागरी हिताचे रक्षण करण्यासाठी आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, भारतीय तटरक्षक दल 01 फेब्रुवारी 1977 रोजी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संघाचे सशस्त्र दल म्हणून अस्तित्वात आले. भारतीय नौदलाकडून हस्तांतरित केलेल्या दोन लहान कॉर्वेट्स आणि पाच गस्ती नौकांनी सुरुवात करत, या तटरक्षक दलाने “वयं रक्षामह” म्हणजेच “आम्ही संरक्षण करतो” या ब्रीदवाक्याने आपले कार्य सुरू केले. आज अस्तित्वाच्या 48 वर्षांनंतर, या दलाकडे देशाच्या 7500 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर 154 जहाजे, 78 विमाने आणि 42 कार्यालये यांसह हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे तटरक्षक दल बनले आहे.
दरवर्षी भारतीय तटरक्षक दल तटरक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करते. 48 वा स्थापना दिनानिमित्त भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीने 01 फेब्रुवारी 2024 रोजी कार्यालय परिसरात एक समारंभ आयोजित केला होता यात जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी, कॉर्पोरेट मान्यवर, भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी आणि तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी या कार्यालयांच्या कमांडिंग ऑफिसर्स यांची प्रमुख उपस्थिती होती. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्ती किरण पुजार, रत्नागिरी पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी, भा पो से, सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त राजकुमार कोलीपाका, भा रा से, विभागीय वान अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई, भा व से आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान भारतीय तटरक्षक दलाच्या कार्याचे आणि जबाबदाऱ्यांचे माहिती उपस्थित पाहुण्यांना देण्यात आली. त्यानंतर शास्त्रीय संगीत आणि नृत्याचा समावेश असलेला छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. तटरक्षक दलाच्या कमांडिंग ऑफिसरने भारतीय तटरक्षक दलास जबाबदारीचे पालन करताना वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल सर्व निमंत्रितांचे आभार मानले.












