दापोली | प्रतिनिधी : दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे सध्याचे समर्थक व उबाठा गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई हे कोणती भूमिका घेतात आणि कोणता याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
किशोर देसाई हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक असून त्यांनी दापोलीचे पहिले शाखाप्रमुख म्हणून काम केले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये शिवसेना वाढीसाठी ते त्याकाळी प्रयत्नशील होते. संघटना वाढीसाठी त्यांच्यावर अनेक केसेस देखील झाल्या होत्या. त्यानंतर पंचायत समितीमध्ये त्यांनी सभापती पद भूषविले होते. मात्र त्यावेळच्या काळात सभापतीपदावरून मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी सूर्यकांत दळवी यांना आव्हान उभे करत विधानसभेची निवडणूक लढवत सुमारे 20 हजार मते पदरात पाडून घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते व तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर.आर.पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने त्यांना संपूर्णपणे ताकद दिली होती. त्यामुळे त्यांनी दापोली व मंडणगड तालुक्यामध्ये आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीची बांधणी केली होती. मात्र खेडचे संजय कदम यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर व त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाल्याने देसाईंनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकावले होते. त्यावेळी श्री. देसाई यांना विधानसभेला 5 हजार मते मिळाली होती व संजय कदम हे सूर्यकांत दळवी यांना पराभूत करून आमदार झाले होते.
त्यानंतर श्री. देसाई यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जात शिवसेनेचा भगवा हातात घेतला होता मात्र विद्यमान आ. योगेश कदम यांच्या दापोलीतील दमदार आगमनानंतर दळवीसमवेत शिवसेनेत सक्रिय झालेले देसाई हे विरोधी गटात गेले होते. त्यानंतर योगेश कदम आमदार झाले व पुन्हा एकदा शिवसेना फुटली त्यावेळी श्री. देसाई हे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात सामील झाले. मात्र पक्षात अन्याय होत असून आपल्याला विश्वासात घेतले जात नाही अशी त्यांची भावना झाल्याने ते सूर्यकांत दळवी यांच्यासमवेत भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा पूर्ण मतदार संघात सुरू झाली होती. त्यानंतर श्री. दळवी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला पण किशोर देसाई हे त्यांच्यासमवेत दिसले नाहीत. सध्या देसाई हे राजकारणापासून अलिप्त असल्याची चर्चा असून पक्षाअंतर्गत डावलले जात असल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
श्री. देसाई आता कोणता झेंडा हाती घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून भाजपा, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट) या सगळ्याच पक्षांकडून त्यांना ग्रीन सिग्नल असल्याचेही सांगण्यात येत आहे. आगामी काळात दापोलीत उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे असून या दौऱ्यावेळी श्री. देसाईंचा राजकीय कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.












