बाल शल्य चिकित्सा विभागात सुपर स्पेशलिस्ट अभ्यासक्रमात मिळविले विशेष प्राविण्य
किशोर राणे (सिंधुदुर्ग ) :
डॉक्टर म्हणजे कलीयुगातील देव…अन् देवाघरची फुले म्हणजे लहान बालके… दुडदुडू धावताही न येणाऱ्या लहान बाळांना व्याधीमुक्त करण्याचे दिव्यत्व करणारी डॉक्टर म्हणजे डॉ.अदिती विजय कविता दळवी! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पार सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या हरकुळ खुर्द -मोहूळ या गावातील या कन्येने वैद्यकिय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. बाल शल्य चिकित्सा विभागात सुपर स्पेशलिस्ट म्हणून विशेष प्रावीण्य मिळवतानाच तीने (MUHS)राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. आरोग्य विद्यापिठाच्या परिक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
डॉ.अदीती ही M.B.B.S, M.S.General Surgery व आता MCh.Paediatric Surgery (Hon.)अशी पदवी मिळवत लहान मुलांना अधिकाधीक प्रगत सेवा देण्यास ती सज्ज झाली आहे.
डॉ. अदिती ही हरकुळ खुर्द मोहूळ येथील माजी सैनिक कै.साबाजी शंकर दळवी उर्फ ताता दळवी यांची नात.त्यांची तिव्र इच्छा होती की दळवी घराण्यात एक तरी डॉक्टर व्हायला हवा. त्यांची इच्छा कु.अदितीने एक सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर होऊन पूर्ण केली. मागील तीन वर्षात तिने सायन हॉस्पीटल मध्ये लहान मुलांची व्यंगे दूर करण्यासाठी अनेक शस्रक्रिया कुशलतेने पार पाडल्या आहेत.या खेरीज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत त्यांच्या टिमने विशेष कॅम्प अॅरेंज करुन लहान मुलांवरील शस्रक्रिया यशस्वीपणे करत आहेत.
डॉ.अदिती म्हणते, लहान मुलांची सेवा करताना विशेष आनंद होतो. गेली ३० वर्षे एक स्वप्न पाहत मी काम करत गेले.अन यश मिळत गेले. मी माझ्या स्वप्नाचा पाठलाग करतेय…कारण स्वप्न आयुष्याला उद्देश देतात. यापुढेही या क्षेत्रात अधिक चांगली सेवा कशी देता येईल यासाठीच मी प्रयत्न करेन असे ती सांगते.माझ्या या यशात पप्पा, मम्मी, आई, दादा, भाऊ अनिश आणि माझ्या परिवाराचा व सर्व शिक्षकांचा मोठा वाटा आहे. त्यांचे समर्थन आणि वेळोवेळी मिळणारे प्रोत्साहन यामुळे हे सारे शक्य झाले असे डॉ.अदिती म्हणते.
सर्वसामान्य कुटुंबातून डॉक्टर झालेली अदिती हीच्या हरकुळ खुर्द येथील दळवी परिवारात वैद्यकिय सेवेचा वारसा नाही. मात्र खडतर परिश्रम करत पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखेपाटील फाऊंडेशन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, अहमदनगर ला एमबीबीएस झाल्यानंतर जेजे हॉस्पिटलला इंटर्नशीप सुरु केली. दरम्यान डॉ. वसंतराव पाटील फाउंडेशनच्या मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, नाशिक मार्फत पोस्ट इंटर्नशिप करतानाच, जनरल सर्जरीमध्ये ३ वर्ष मास्टर्स केले.लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन येथे प्रॅक्टीस करत बालरोग शल्यचिकित्सक सुपरस्पेशलिस्ट बनली आहे.
बाल शल्याचिकित्सा या सुपरस्पेशालिटी शाखा अंतर्गत २००८ ते २०२४ या कालावधीत तीने अभ्यासक्रम पुर्ण केला. एक दिवसाच्या बाळापासून ते १८ वर्षाच्या मुलांवर विविध शस्त्रक्रीया करत त्यांना व्याधीमुक्त करण्यात डॉ.अदीती यांचे अफलातून कौशल्य आहे. उदारणार्थ, जन्मजात विसंगती, आतड्यांचे आजार , यकृत, अन्न नालिका, फुफुसाचे गाठ, किडनीचे आजार, सुंठा, हायड्रोसेफ्लस (मेंदू मध्ये पाण्याचे प्रमाण वाढणे), मेनिंगोमायेलोसेले (पाठीच्या कन्याचे विकार), डायफ्रामॅटिक हर्निया, यासारख्या अनेक आजारांवर ती अनेक बाळांना आपल्या कौशल्याने सदृढ बनवत आहे.
ज्येष्ठ वैद्यकिय विशेषज्ञ डॉ.संजय ओक आणि डॉ.पारस कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अदिती सध्या मुंबई सायन येथे प्रॅक्टीस करत आहे.तीच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र तीचे कौतुक होत असून दळवी परिवाराचेही अभिनंदन केले जात आहे.











