Israeli Airstrike on Gaza : गाझावर इस्राईलचे पुन्हा हल्ले! १८ जणांचा मृत्यू

राफा : इस्राईलने शनिवारी रात्री आणि रविवारी गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती माध्यमांनी आणि प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे. इस्राईलने राफा आणि खान युनिस येथे हवाई हल्ले केले.

या हल्ल्यात राफा येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एक महिला आणि तीन मुलांचा समावेश असल्याचे माध्यमांनी सांगितले. (Israeli Airstrike on Gaza Latest News)

मागील दोन महिन्यांपासून इस्राईलने या दोन शहरांना लक्ष्य केले आहे. त्याच प्रमाणे गाझा शहरात केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, अल्जेरियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये इस्राईल-हमास दरम्यान युद्ध थांबविण्याबाबत मांडलेला ठराव अमेरिकेने फेटाळला आहे. ”अमेरिका ज्या मुद्द्यांच्या आधारे युद्ध संपविण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना छेद देणारे मुद्दे या ठरावात असल्याने या ठरावाला आमचा विरोध आहे,” असे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी शनिवारी रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नासेर रुग्णालयात उपचार करणे शक्य नाही
गाझा मधील नासेर रुग्णालयावर मागील आठवड्यात इस्राईलच्या सैन्याने केलेल्या कारवाईमुळे आता या रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणे शक्य होत नसल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या(डब्लूएचओ) वतीने देण्यात आली आहे. ‘डब्लूएचओ’चे अध्यक्ष डॉ. डॉ टेड्रोस अधानोम घेब्रायसिस यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.