सात मार्चला होणार उद्घाटन!
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारामुळे अनेक वर्षे रेंगाळलेले काम लागले मार्गी.
सिंधुनगरी l बाळ खडपकर :ग्राहक चळवळीला बळकटी देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची सुंदर वास्तु उभी झाली असून या सुंदर वास्तूमुळे सिंधुदुर्ग नगरीच्या वैभवातही भर पडली आहे. सन 2009 साली प्रशासकीय मान्यता झालेली व अनेक वर्षे रखडून पडलेली ही वास्तू जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घातल्यामुळे पूर्णत्वास गेली आहे. या वास्तूचा लोकार्पण सोहळा भारत सरकारचे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते गुरुवारी 7 मार्चला होत आहे.
या उद्घाटनासाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, खासदार विनायक राऊत विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, वैभव नाईक, निलेश राणे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट परिमल नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होत आहे.
सिंधुनगरी येथील पत्रकार भवनाच्या पाठीमागे असलेल्या नवनगर प्राधिकरण भूखंड क्रमांक 26 ही भव्य वास्तू सार्वजनिक बांधकाम विभागाने अंतर्गत सुविधांसह पूर्ण केली आहे. सन 2009 मध्ये या इमारतीची प्रशासकीय मान्यता होऊन या इमारतीचे सन 2011 मध्ये बांधकाम पूर्ण झाले होते. व 29 लाख 67 हजार त्यावर खर्च झाले होते. मात्र त्यावर अंतर्गत सुविधांसाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे ही वास्तू गेली दहा ते अकरा वर्षे अडकून पडली होती. याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घातले. जानेवारी 2023 मध्ये शिल्लक राहिलेल्या कामांसाठी एक कोटी दहा लाखाचा भरीव निधी देत याची प्रशासकीय मान्यता झाली व केवळ दोन महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार सर्वगोड यांचेही याबाबत कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील ग्राहक चळवळीला बळकटी देणाऱ्या व ग्राहकांना वाचा फोडणाऱ्या जिल्हा ग्राहक मंचाला स्वतंत्र वास्तू निर्माण झाल्यामुळे अनेक पक्षकार ग्राहकानी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ग्राहक मंचाला अध्यक्ष व दोन सदस्यांची पदेही मिळालेली असून सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाचे काम आणखी गतिमान झाले आहे. आता ही नवीन वास्तू या मंचाला उपलब्ध झाल्यामुळे ग्राहक मंचाच्या कामकाजालाही सुरळीतता आली आहे. जिल्हाधिकारी भवनातील कार्यालयाचे स्थलांतर आता या नवीन वस्तू झाले असून या वास्तुत प्रवेशद्वारावरच कोर्ट हॉल, कार्यालयीन प्रमुख कक्ष, आस्थापना कार्यालय, रेकॉर्ड रूम आधी स्वतंत्र कक्ष निर्माण झाले आहेत. न्यायदानातील कायदेशीर तरतुदी व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी नुसार या ग्राहक मंचाचे काम पक्षकारांसाठी या सुंदर वास्तुत न्यायिक व गतिमान व्हावे यासाठी दैनिक प्रहार च्या वतीने या नूतन वास्तू उद्घाटन सोहळ्यास व ग्राहक मंचाच्या कामकाजास मनस्वी शुभेच्छा!










